*कोकण Express*
*भाजी मार्केट जागेत नगररचना सहाय्यकांनी जबरदस्ती घुसखोरी केल्याची ग्लोबल असोसिइट्सची तक्रार*
*कारवाईची ग्लोबल असोसिइट्सची मागणी*
*पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नगरपंचायत भाजी मार्केट डेव्हलपर्स ग्लोबल असोसिइट्स वर कोणतीही कारवाई करण्यास ९ फेब्रुवारीपर्यंत हायकोर्टाने मनाई करूनही आरक्षित भूखंड क्र.२५ मधील जागेत नगरपंचायत नगररचना सहाय्यक मयूर शिंदे व दोघा सहकाऱ्यांनी जबरदस्ती घुसखोरी केल्याबद्दल त्यांच्यावर आयपीसी कलम ४४१, ४४७ नुसार कारवाई करावी असा तक्रार अर्ज ग्लोबल असोसिइट्स च्या वतीने आज सकाळी कणकवली पोलीस ठाण्यात देण्यात आला आहे.
कणकवली नगरपंचायत आणि विकासक ग्लोबल असोसिइट्स यांच्यातील भाजी मार्केट आरक्षित भूखंड क्र.२५ मधील इमारत बांधकामाचा वाद सध्या हायकोर्टात प्रलंबित आहे. नगरपंचायत ने एम आर टी पी ऍक्ट कलम ५४ नुसार कारवाईची नोटीस दिल्यानंतर ग्लोबल असोसिइट्स ने त्याविरोधात हायकोर्टात पिटीशन दाखल केले आहे. पिटीशन ची सुनावणी ९ फेब्रुवारीला असून सूनावणीआधी ग्लोबल असोसिइट्स वर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले असून तशी नोटीस आपण नगराध्यक्ष, सीईओ तसेच नगररचना सहाय्यकाना बजावल्याचे ग्लोबल असोसिइट्स ने तक्रार अर्जात नमूद केले आहे. तरीही १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता नगररचना सहाय्यक मयूर शिंदे, सचिन नेरकर, करंदीकर हे तिघे जबरदस्तीने भाजी मार्केट च्या जागेत घुसले असता आपल्या कामगारांनी अटकाव केल्यावर नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या हुकुमानुसार आपण भाजी मार्केट च्या जागेत प्रवेश केल्याचे शिंदे यांनी सांगितल्याचेही तक्रार अर्जात नमूद केले आहे. आता भाजी मार्केटवरून ग्लोबल असोसिइट्स आणि नगरपंचायत यांच्यातील वाद काय वळण घेतो ? याचीच कणकवलीवासीयांना उत्सुकता आहे.