सारेच पुरुष नसतात बदनाम:चर्चा आणि चिकित्सा

सारेच पुरुष नसतात बदनाम:चर्चा आणि चिकित्सा

*कोंकण Express*

*’सारेच पुरुष नसतात बदनाम:चर्चा आणि चिकित्सा’*

*समीक्षा ग्रंथाचे २३ रोजी मालवण येथे प्रकाशन*

*कवी अजय कांडर, समीक्षक प्रा. डॉ जिजा शिंदे यांचे संपादन*

*कणकवली/प्रतिनिधी*

कवी अजय कांडर व समीक्षक प्रा.डॉ.जिजा शिंदे (संभाजीनगर – औरंगाबाद) यांनी ‘सारेच पुरुष नसतात बदनाम: चर्चा आणि चिकित्सा’ हा समीक्षा ग्रंथ संपादित केला आहे. प्रभा प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन मालवण येथे 23 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या समाज संवाद साहित्य संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध समीक्षक रणधीर शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
‘सारेच पुरुष नसतात बदनाम’ हा 19 कवयित्रींच्या कवितांचा काव्यसंग्रह दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला. या संग्रहाला महाराष्ट्रातील रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आणि तो बहुचर्चितही ठरला. त्यावर महाराष्ट्रातील नव्या दमाने समीक्षालेखन करणारे अभ्यासक अंजली कुलकर्णी, प्रा. संजीवनी पाटील, प्रा. चंद्रकांत पोतदार, प्रा. जिजा शिंदे, प्रा. वैभव साटम, अंजली ढमाळ, ऋषिकेश देशमुख आणि मुक्ता कदम यांनी समीक्षा लेखन केले.या समीक्षा लेखनाचा ‘सारेच पुरुष नसतात बदनाम: चर्चा आणि चिकित्सा’ हा ग्रंथ संपादित करण्यात आला. सदर संपादनाविषयी या ग्रंथाचे संपादक आपल्या संपादकीय मध्ये म्हणतात की, वर्तमानाला कवेत घेत समकालाची भाषा अभिव्यक्त करणारी ही कविता पुरुषाचे स्त्रीला स्वातंत्र्याचे पाठबळ देणारी ठरते. ‘सारेच पुरुष नसतात बदनाम : चर्चा आणि चिकित्सा’ समीक्षा ग्रंथाच्या निमित्ताने मराठी साहित्यविश्वात वर्तमानातल्या पुरुषाबद्दल मांडलेला नवा आणि अस्सल विचार देणारा हा समीक्षाग्रंथ ठरणार आहे. सदर समीक्षा ग्रंथातून अभ्यासकांनी पुरुषाबद्दल घेतलेला सत्याचा शोध, पुरुषभर व्यापलेला करुणेचा धागा मुखर करणाऱ्या कविता, स्त्रीच्या अन्याय विरुद्ध ब्र काढणारा पुरुष हे नवे पुरुषाचे रुप वाखण्याजोगे ठरले आहे. स्त्रीच्या बाजूने असणाऱ्या पुरुषांविषयीची कविता असे कवितेचे स्वरूप नोंदविण्याचा प्रयत्न ‘सारेच पुरुष नसतात बदनाम’ या ग्रंथात केला आहे. या समीक्षा ग्रंथाची प्रसिद्ध समीक्षक प्रा.गोमटेश्वर पाटील यांनी पाठराखण केली असून त्यात ते म्हणतात, स्त्रीची कविता म्हणजे आत्तापर्यंत स्त्रीवादी किंवा तिच्या विश्वात रमणाऱ्या स्त्रीची कविता होती. पुरुषी मानसिकतेविरुद्ध तिचा लढा, स्त्रीचे आदिमत्व,तिचे मातृत्व आणि इतिहासातील कर्तबगार स्त्री अशा पटलावर जगभर तिच्याविषयी लिहिले गेले. परंतु इथे मात्र स्त्रीच्या बाजूने असणाऱ्या पुरुषाविषयी, तिच्या आणि त्याच्या नात्याविषयी, धर्मनिती, कायदे कानून यांनी बनवलेल्या नात्यांपलीकडे तिच्या बाजूने असणाऱ्या पुरुषाविषयी या कवयित्री आपल्या कवितांमधून ठाम विश्वास व्यक्त करत आहेत. या सगळ्यातून पुरुषाचे एक नवीन नाते या कवित्रींनी अधोरेखित केलेले आहे. या पार्श्वभूमीवर मानवी इतिहासात न दिसणाऱ्या या एका नव्यानात्यासंबंधा विषयी ‘सारेच पुरुष नसतात बदनाम:चर्चा आणि चिकित्सा’ या ग्रंथात समीक्षकांनी घेतलेल्या नोंदी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.
दरम्यान या संग्रहाचे देखणे मुखपृष्ठ इस्लामपूर येथील तरुण चित्रकार प्रशीक पाटील यांनी तयार केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!