*कोंकण Express*
*दर्जेदार अन्न निर्मितीसाठी नैसर्गिक शेती करा*
*नैसर्गिक शेती द्वारे पिकांच्या स्थानिक वाणांचे संवर्धन करा*
*वेळ, श्रम व पैसा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी संयुक्त पद्धतीने नैसर्गिक शेती करावी*
*ब्रिगे. सुधीर सावंत माजी खासदार*
कृषी विज्ञान केंद्र किर्लोस आणि कणकवली ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने अस्मिता फार्म डांमरे येथे खरीप हंगाम पूर्व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. खरीप हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या भात, नाचणी व वरी पिकांच्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत होते. यावेळी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपल्या जिल्ह्यातील लोकांनी संयुक्तपणे नैसर्गिक शेती करावी. व आपला वेळ, श्रम व पैसा वाचवावा. शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध व आनंदी होण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने शेती करून दर्जेदार अन्न निर्मिती करावी व त्यामुळे मानवाचे व जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल, तसेच पिकांच्या स्थानिक वाणांचे संवर्धन होईल असे ते म्हणाले. गावागावात जैविक खते, बी बियाणे, औषधे निर्माण करावीत. गावातला पैसा गावातच राहिला पाहिजे व बाहेरचा पैसा गावात यायला पाहिजे. भरडधान्य लागवडीचे क्षेत्र वाढवून रोजच्या आहारामध्ये भरड धान्यांचा वापर करावा असे आवाहन शेतकऱ्यांना ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले. माकडांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्यात माकडांची प्रगणना चालू असून नसबंदीच्या परवानगीसाठी सरकारकडे प्रयत्न करणार असे ते म्हणाले. मेळाव्याच्या सुरुवातीला समृद्ध आणि आनंदी गावाची चित्रफीत दाखविण्यात आली. भरड धान्यांचे विविध प्रकार, त्याचे महत्त्व आणि लाल भाताची लागवड याविषयी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ विवेक सावंत भोसले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सुरुवातीला मेळाव्याचे प्रास्ताविक केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे यांनी केले. तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांनी कृषी विभागाच्या शेती विषयक योजनांची माहिती दिली. यावेळी कणकवली ऑरगॅनिक फार्म प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष अलंकार रावराणे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या व लवकरच लोरे येथे कंपनीचे कायमस्वरूपी कार्यालय सुरू करणार असे म्हणाले. नैसर्गिक शेतीचे शेतकरी एन. बी. राणे यांनी शेतकऱ्यांना आपले नैसर्गिक शेतीचे अनुभव कथन केले. उपस्थित शेतकऱ्यांना कृषि विज्ञान केंद्रा द्वारे रत्नागिरी ७ या पौष्टिक लाल भाताच्या बियाण्याचे , नाचणीचे दापोली १व वरीचे सात्विक या जातीच्या बियाण्याचे वितरण करण्यात आले. तसेच मेळाव्यामध्ये कृषि विज्ञान केंद्राच्या फळ प्रक्रिया केंद्रामध्ये तयार केलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. मेळाव्याला कृषी प्रतिष्ठानचे सचिव शांताराम रावराणे उपस्थित होते. तसेच कणकवली तालुक्यातील शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत, विकास धामापूरकर, डॉ. केशव देसाई, विवेक सावंतभोसले, सौ. सुमेधा तावडे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. विलास सावंत यांनी केले तर आभार विवेक सावंतभोसले यांनी मानले.
*बाळकृष्ण के. गावडे*
*वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख*
*कृषि विज्ञान केंद्र किर्लोस*