जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण : श्रावणी कंप्युटर, अक्षरोत्सव परिवाराचे आयोजन

जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण : श्रावणी कंप्युटर, अक्षरोत्सव परिवाराचे आयोजन

*कोंकण Express*

*जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण : श्रावणी कंप्युटर, अक्षरोत्सव परिवाराचे आयोजन*

*विचारच माणसाला मोठे करू शकतात : प्रणय शेट्ये*

*तळेरे ः प्रतिनिधी*

आपण करीत असलेल्या कामामुळे आपली ओळख होणे महत्त्वाचे असून आपण आपले छंद जोपासले पाहिजेत. विचार माणसाला मोठे करू शकतात आणि तेच पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतात. यशस्वी आयुष्य जगण्यासाठी धेय्य, आवड, निरीक्षण, जिद्द आणि प्रत्येक क्षणी जाणीव असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संगीतकार, गीतकार प्रणय शेट्ये यांनी केले.

तळेरे येथील श्रावणी कंप्युटर आणि अक्षरोत्सव परिवाराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन संगीतकार गीतकार प्रणय शेट्ये आणि ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार, कवी – अभिनेते प्रमोद कोयंडे, तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे अध्यक्ष उदय दुधवडकर, संजय खानविलकर, स्पर्धेचे परीक्षक अभिजित राणे, श्रावणी कंप्युटरचे संचालक सतीश मदभावे, अक्षरोत्सव परिवार प्रमुख निकेत पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत तीन गटात मिळून एकूण 409 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. या स्पर्धेसाठी शेषनाथ दामोदर मराठे यांनी सर्व बक्षिसे पुरस्कृत केली होती.

पुढील स्पर्धेत सहभागासाठी आवाहन (चौकट)
यापुढील स्पर्धेची घोषणा निकेत पावसकर यांनी यावेळी केली असून यावर्षी संवेदनशील कवी, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांच्या सामाजिक विषयावरच्या दोन कविता स्पर्धेसाठी देण्यात आल्या आहेत. ही स्पर्धा 1 ते 4 थी, 5 ते 8 वी व 9 वी ते 12 वी अशा तीन गटात होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

यावेळी बोलताना ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार म्हणाले की, आपण सर्वच मोठे व्हा, आई वडिलांचे नाव मोठे करा, असे सांगत सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी विनोदवीर दादा कोंडके यांच्या विविध भूमिका सादर करत सभागृहात प्रचंड हास्यकल्लोळ उडविला. यावेळी स्पर्धेचे परीक्षक अभिजित राणे यांनीही हस्ताक्षराबाबत विविध बारकावे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील विविध ठिकाणचे स्पर्धक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी बागवे, प्रास्ताविक निकेत पावसकर तर आभार सतीश मदभावे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!