*कोंकण Express
*राणेंनी सिंधुदुर्गाला विकासापासून वंचित ठेवले; संदेश पारकर यांची टीका…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक ही धनशक्ती विरद्ध जनशक्ती अशी आहे. या
मतदारसंघातून महायुतीकडून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी उमेदवारी घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता गेली कित्येक वर्षे राणेंनी हाती आहे. सत्तेच्या माध्यमातून राणेंनी स्वतःचा विकास केला आणि जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवले, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली. 2014 लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत हे दीड लाखांच्या मताधिक्यांनी निवडून आले होते. 2019 लोकसभा निवडणुकीत राऊत हे पावणे दोन लाखांच्या मताधिक्यांनी निवडून आले होते. 2024 लोकसभा निवडणुकीत अडीच लाखांच्या मताधिक्यांनी त्यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागून त्यांना तिसऱ्यादा विजयी करण्याचा निर्धार सर्वांनी करून राणेंचा दारुण पराभव करण्यासाठी एकजुटीने काम करूया, असे आवाहन श्री. पारकर यांनी केले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कणकवली शहरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित केला होता. याप्रसंगी श्री. पारकर बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख नीलम पालव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, अनिल डेगवेकर, नीलेश गोवेकर, वैदेही गुडेकर, माधवी दळवी, संदीप कदम आदी उपस्थित होते.