*कोंकण Express*
*करियरच्या वाटेवर या निवासी कार्यशाळेची यशस्वी सांगता*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
कणकवली तालुक्यातील तळेरे येथे प्रज्ञांगण , श्रावणी काँम्प्युटर व डाॅ. अनिल नेरूरकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या करिअरच्या वाटेवर या निवासी कार्यशाळेचा समारोप विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाने झाला. या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी विविध मान्यवरांनी आपल्या क्षेत्रातील संधी आणि त्यातील करिअर याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी प्रा. प्रशांत हटकर यांनी विद्यार्थ्यांना योगा आणि या योगाचे विद्यार्थ्यांच्या जीवनातले महत्त्व समजावून सांगत विद्यार्थ्यांकडून विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान करून घेतले. तर कार्यक्रमाच्या सांगता समारोपाच्या दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री अक्षता अनिल कांबळी यांनी मालवणी गजाली मारत विद्यार्थ्यांना आनंदाने उत्साही व प्रफुल्लित केले. यावेळी त्यांनी आपला मराठी चित्रपट ते बॉलिवूड चित्रपटापर्यंत झालेला प्रवास उलगडला. या दरम्यान कितीही अडचणी आल्या तरीदेखील कामात सातत्य राखले पाहिजे आणि प्रयत्न सोडू नयेत, असा मोलाचा सल्ला दिला.
या दरम्यान डॅा. अनिल नेरुरकर यांनी स्मित सभागृहाच्या श्रीम. सायली डंबे यांना त्यांच्या जीवनातील अडचणी त्यावेळी घेतलेल्या निर्णयांची माहिती आणि आयुष्यात अडचणी येऊनही वेगवेगळ्या व्यवसायात कसे यशस्वी झाल्यात हे मुलांना ज्ञात करून देण्याचा प्रयत्न केला.
यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या समारोपा दरम्यान डॉ. अनिल नेरुरकर यांचे सर्वच विद्यार्थ्यांनी आभार मानत या दीड दिवसाच्या कॅम्पमुळे त्यांना मिळालेल्या अनुभवाबद्दल स्वतः कृतज्ञता व्यक्त केली.
समारोपाच्या दरम्यान डॉक्टर अनिल नेरूरकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच कार्यशाळेतील सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर, सौ. श्रावणी मदभावे, सतीश मदभावे उपस्थित होते. या कार्यक्रमात संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर, श्रीमती सायली डंबे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली मांजरेकर यांनी केले.
ज्या विद्यार्थ्यांनी या कॅम्पसाठी सुरुवातीला थोडी नकारार्थी भूमिका दर्शविलेली असतानाही या शिबिरात सहभाग घेतला. परंतु समारोपाला मात्र याच विद्यार्थ्यांचा निरोप घेण्याची इच्छा देखील दिसत नव्हती. अजूनही खूप शिकायची इच्छा असल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी समारोपाला प्रतिक्रिया व्यक्त केली.