*कोंकण Express*
*खारेपाटण महाविद्यालयाच्या 1982 चे विद्यार्थी आले एकत्र,
वारगावात रंगला स्नेहमेळावा उत्साहात : जुन्या आठवणींत खेळही रंगले*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालयातून १९८२ साली बारावी परीक्षा दिलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा वारगाव येथे उत्साहात झाला. इतक्या वर्षांनंतर भेटलेल्या जुन्या वर्गमित्रांनी या स्नेहभेटीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. आणि जुने असंख्य खेळही हे सर्वजण पुन्हा एकदा खेळले.
खारेपाटणचे उद्योगमहर्षी (कै.) दादा ढमाले यांचे सुपुत्र संजय देसाई (ढमाले) यांनी कॉलेजच्या नूतनीकरण, विस्तारीकरण व पुढील प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांचा संपर्क घडवून आणला. तेथूनच मित्र-मैत्रिणींना एकमेकांच्या संपर्काचे वेध लागले. शोधाशोध सुरू झाली. भराभर एकामेकांकडून फोननंबर शोधून काढत सर्व वर्गमित्र संपर्कात आले. यातील काहीजण उद्योग व्यवसायात, तर काहीजण नोकरी क्षेत्रात स्थिरावले आहेत. तरीही काहीजण प्रत्यक्ष भेटून तर काहीजण व्हॉट्सअप व फोनद्वारे एकमेकांच्या संपर्कात सतत राहिले. तेथूनच एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याची तळमळ निर्माण झाली.
अप्रत्यक्ष भेटीतून मिळणारा आनंद प्रत्यक्ष भेटीसाठी खुणावू लागला आणि वारगाव येथे स्नेहभेटीचा कार्यक्रम ठरला. मुंबई येथून शेखर देसाई (ढमाले), विजय केसरकर, श्रीरंग कानडे, प्रदीप पाटील, सुनील गिरकर, शिवाजी सावंत, मोहन तानवडे, नंदिनी शेट्ये, प्रमिला शेट्ये, चिपळूण येथून दिलीप भाबल, कोल्हापुरातून शैलजा गोखले, रत्नागिरीतून सुरेखा देवस्थळी, उषा ठाकूरदेसाई, देवाचे गोठणे येथून मुरारी गोठणकर, ओणी येथून दीपक लिंगायत, पाचल येथून वृंदा लिंगायत, नडगिवेतून दिलीप मन्यार, कुणकवण येथून अशोक गांगण आदींची स्नेहभेटीची तयारी झाली. आणि तब्बल 42 वर्षांनंतर प्रत्यक्ष भेटीचा योग आला नि आनंद ओसंडू लागला. या स्नेह मेळाव्याच्या सुरुवातीला दिवंगत सवंगड्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी प्रत्येकाने आपली ओळख आणि कौटुंबिक जीवनाबद्दल थोडक्यात ओळख करून दिली. यादरम्यान परिसरातील आपल्या काही मित्र मैत्रिणींच्या घरांना धावती भेट झाली. तसेच, वारगाव माध्यमिक विद्यालयाला या सर्व मित्र मैत्रिणींना सदिच्छा भेट दिली. तर तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांनी यावेळी या स्नेह मेळाव्याला सदिच्छा भेट दिली. यावेळी पावसकर यांच्या अक्षरोत्सव या उपक्रमाची माहिती सर्वांना देण्यात आली. या मेळाव्या दरम्यान अधूनमधून अंताक्षरी, विविध कला सादरीकरण, शालेय जीवनातील काही गंमतीशीर किस्से सादरीकरण झाले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेमाची आठवण म्हणून भेटवस्तू देऊन स्नेहमेळाव्याची सांगता झाली.