तळेरे येथे शिमगोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि विविध कार्यक्रमांनी साजरा

तळेरे येथे शिमगोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि विविध कार्यक्रमांनी साजरा

*कोंकण Express*

*तळेरे येथे शिमगोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि विविध कार्यक्रमांनी साजरा*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

कणकवली तालुक्यातील तळेरे येथे शिमगोत्सव मोठ्या भक्ती भावाने आणि विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. या उत्सवाची समाप्ती रविवारी रात्रौ झाली. यानिमित्त विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम पार पडले.
शिमगोत्सवात कोकणात विविध परंपरा अजूनही पहायला मिळतात. शिवाय, धार्मिक श्रद्धा आणि त्या अनुषंगाने विविध धार्मिक कार्यक्रमही परंपरेनुसार विविध ठिकाणी या दरम्यान भक्तिभावाने केले जातात. तळेरे येथील होळी चव्हाट्यावर श्री देव गांगेश्वर आणि खर्जादेवीची पालखी आणि इतर देवता स्थानापन्न होतात. या काळात अनेक माहेरवाशिणी देवीची ओटी भरण्यासाठी आणि होलिसमोर नतमस्तक होण्यासाठी येतात. तर गावातील सर्व मंडळी याठिकाणी देवतांसमोर नतमस्तक होतात.
या दरम्यान श्री गांगेश्वर प्रासादिक नाट्य मंडळ तळेरे गावठाण यांच्या वतीने होळी मांडावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गावातील अनेक शालेय मुलांनी आपल्यातील कलाविष्कार सादर केलेत. हे कार्यक्रम दोन दिवस चालले. त्याशिवाय, यावेळी प्रबोधनात्मक एकांकिका सादर करण्यात आल्या.
तर राठीवडेकर यांच्या दशावतार प्रयोग झाला. यावेळी गावच्यावतीने सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी सूर्यकांत तळेकर, देवस्थानचे मानकरी प्रकाश घाडी, दशावतार नाट्य मंडळाचे प्रमुख श्री. मेस्त्री, आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण वरुणकर यांचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या सर्व कार्यक्रमांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर शेवटच्या दिवशी सकाळपासून ग्रामस्थांनी ओटी भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. त्यानंतर गाऱ्हाणी झाली आणि शिमगोत्सवाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!