*कोंकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात ॲक्सिस बँकेचा रोजगार मेळावा संपन्न*
फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय मध्ये ॲक्सिस बँकेचे प्लेसमेंट कॅम्प संपन्न झाला. महाविद्यालयाच्या रोजगार स्वयंरोजगार व स्पर्धा परीक्षा विभागा मार्फत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचा रोजगार स्वयंरोजगार विभाग हा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. छोट्या-मोठ्या कंपन्या, बँकांशी संपर्क साधून महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या मेळाव्यातून महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. आयबीएफ च्या सहाय्यक व्यवस्थापक शुभांगी खुडी यांच्या टीमने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. प्रारंभी मनोगत व्यक्त करताना शुभांगी खुडी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी सकारात्मक राहिले पाहिजे. जगातील घडामोडींची माहिती अद्यावत ठेवली पाहिजे. जग झपाट्याने बदलत आहे. आपणही बदलत्या जगाबरोबर बदलले पाहिजे. तो बदल सकारात्मक असला तर आपली प्रगती होण्यास वेळ लागत नाही. जगाचा वेग फार मोठा आहे, तो आपल्याला सांभाळावा लागेल. आजच्या जगात प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे, त्यासाठी अशा रोजगार मेळाव्यांची आवश्यकता आहे.
या मेळाव्याचे समन्वयक डॉक्टर बाजीराव डफळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मुलाखतीची चांगली तयारी केली पाहिजे. त्याचा व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास असला पाहिजे. परिपूर्ण अभ्यासच आत्मविश्वास वाढवत असतो. आजकाल बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्यास मोठा वाव आहे. महाविद्यालयाकडून ज्यावेळी प्रयत्न केला जातो, त्या संधीचा फायदा घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. हा रोजगार मिळावे यशस्वी होण्यासाठी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार, सर्व संचालक मंडळ व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ सतीश कामत तसेच प्रा विनोद पाटील यांनी परिश्रम घेतले