*कोंकण Express*
*गेळेतील कबुलायतदार जमीन वाटपास पालकमंत्र्यांकडून “हिरवा कंदील”…*
*मुंबईतील बैठकीत निर्णय; “त्या” २७ हेक्टर आरक्षित जागेच्या निर्णयाला “स्थगिती”…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील गेळे गावाला भेडसावणारा कबुलायतदार प्रश्न सुटल्यात जमा आहे. गावातील जमीन वाटप प्रक्रिया तातडीने सुरुवात करावी तसेच खाजगी वन असा शेरा असलेल्या जमिनी संदर्भात “टाईम बाऊंड” कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. दरम्यान त्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या २७ हेक्टर जमिनीवरील आरक्षणाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यालाही स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी दिला आहे.
पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील ग्रामस्थांची बैठक आज मुंबई येथे मंत्रालयात पार पडली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, सरपंच सागर ढोकरे, ग्रामस्थ आनंद गावडे, विजय गवस, नारायण लाड, सुरेश गावडे, लक्ष्मण गवस आदी ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी वन महसूल विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करून पालकमंत्र्यांनी याबाबतचे सकारात्मक निर्णय घेतले आहेत. दरम्यान याबाबतचा निर्णय झाल्याचे कळताच गेळे येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करीत पालकमंत्री चव्हाण यांचे आभार मानले.