*कोंकण Express*
*कुटुंब, समाजाच्या प्रगतीसाठी महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात यावे : प्रविण काकडे*
*चिरा खाण कामगारांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात प्रतिपादन*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
कुटुंब पर्यायी समाजाची प्रगती व्हायची असेल तर महिलांनीही शैक्षणिक क्षेत्रात यावे. स्त्रियांनी एकसंघ होऊन समाजातील विषमता नष्ट करावी, असे प्रतिपादन अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले. ते रत्नागिरी जिल्ह्यातील कुरतडे येथे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचेवतीने आयोजित महिला दिन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी महिला दिनानिमित्त चिरा खाण कामगार असलेल्या महिला व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना काकडे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे होत असून नुकताच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला तरीदेखील महिलांवरील अत्याचार, अन्याय थांबले नाहीत. त्यामुळे महिलांनी सर्व प्रकारचे शिक्षण घेऊन कुटुंबाला घडवणे आवश्यक असून महिलांनी स्वतःचे आरोग्य सांभाळून स्वतः शिक्षणाची कास धरून मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षणासाठी गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा.
आजही महिलांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. अन्यायाला तोंड द्यावे लागते. यासाठी स्त्रियांनी अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवावा. स्त्री ही अनेक भूमिकेतून जात असते. आई, मुलगी, बहीण, मावशी, आजी, पत्नी या सर्व भूमिका स्त्री निभावत असते. घरात संस्कार देण्याचे काम स्त्री करते म्हणून समाजात स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे. यासाठी आयुर्वेदिक, सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट पुढाकार घेईल स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात (चौकट)
प्रवीण काकडे यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी सह अनेक जिल्ह्यातील असंख्य शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणले. शिवाय, त्यांना विविध प्रकारची मदतही केली जात आहे.
यावेळी विजय गोरे, उद्योजक संतोष झोरे, समीर आखाडे, पांडुरंग बंडगर, अमृत गोरे, दिशा गोरे, साक्षी झोरे, रोहिणी दोरे, वैभव गोयनाक, खाणकाम कामगार व महिला उपस्थित होत्या.