*कोंकण Express*
*एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कार जात असतात.-भालचंद्र मराठे*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
आपल्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींकडून हे संस्कार पुढे जातात. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीत कुटुंबाची काळजी घ्या. तरच एकत्र कुटुंबव्यवस्था पुढे चालत राहील, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक संघटना तळेरे पंचक्रोशीचा मेळावा मोठ्या उत्साहात तळेरे येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे, तालुकाध्यक्ष मनोहर पालयेकर, माजी जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर, दादा वरुणकर, चंद्रकांत तळेकर, अध्यक्ष सुरेश पाटणकर, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, माजी सरपंच विनय पावसकर, माजी पोलीस अधिकारी सूर्यकांत तळेकर, सुरेश तळेकर, बी. पी. साळीस्तेकर, प्राचार्य अविनाश मांजरेकर, संविता आश्रमचे जनसंपर्क अधिकारी महाबळेश्वर कामत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री मराठे यांनी ज्येष्ठ नागरिकांची दिनचर्या कशी असली पाहिजे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
हे दानही आवश्यक (चौकट)
यावेळी बोलताना मनोहर पालयेकर म्हणाले की, इतर दानासोबतच आता मरणोत्तर देहदान, नेत्रदान, चामडी व अवयवदान करण्याचे आवाहन रोटरी क्लब, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, प्रवासी संघ यांच्याकडून करण्यात आले असल्याचे सांगितले. याची आता गरज निर्माण झाली असून तसे इच्छापत्र लिहून दिल्यास आपल्या देहाचा मरणोत्तरही सदुपयोग होऊ शकेल.
ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य (चौकट)
यावेळी बोलताना दादा कुडतरकर म्हणाले की, आम्ही रोटरी क्लब आणि विविध संस्थांच्या माध्यमातून कणकवली येथे विविध सोई सुविधा उपलब्ध केल्या आहेत. आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक अशा कोणत्याही प्रकारच्या गरजेसाठी आम्हाला हाक मारा आम्ही आपल्यासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले.
यावेळी 75 वर्षे पूर्ण केलेल्या पंचक्रोशीतील श्रीधर सुर्वे, विजय तळेकर, जयप्रकाश कल्याणकर, यशवंत गुरव यांचा तर राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्या बद्दल अविनाश मांजरेकर यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य अविनाश मांजरेकर, साळीस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर, सूर्यकांत तळेकर, श्री. घुगे, महाबळेश्वर कामत यांनी मनोगत व्यक्त केले. या स्नेहमेळाव्याला तळेरे सह साळीस्ते, कासार्डे, ओझरम, दारुम येथील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुरेश पाटणकर यांनी, अहवाल वाचन विजय सावंत, जमाखर्च दिलीप पाटील यांनी केले.