*कोंकण Express*
*आर्या भोगले यांना जिल्हास्तरिय मराठी आदर्श शाक्षिका पुरस्कार*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट च्या सहाय्यक शिक्षिका आर्या अनिल भोगले यांना सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाच्यावतीने देण्यात येणारा आदर्श मराठी विषय शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्हास्तरीय या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या पुरस्काराचे वितरण सावंतवाडी येथील शंकरराव गवाणकर महाविद्यालयात करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे पंतवालावलकर अध्यापक महाविद्यालयाचे निवृत्त अध्यापक अरविंद देशपांडे, वेंगुर्ले पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रमेश पिंगुळकर, माजी उप नगराध्यक्ष राजन पोकळे, गवाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस, सुप्रसिध्द लेखिका वृंदा कांबळी, भरत गावडे यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आर्या भोगले यांच्या गेल्या 16 वर्षांच्या कारकिर्दीची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. या कालावधीत वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी वर्ग ग्रंथालयाचा उपक्रम, वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने वाढदिवसाला वर्ग ग्रंथालयास पुस्तक भेट देणे, (या उपक्रमात स्वतःच्या ग्रंथालयातील पुस्तके देखील विद्यार्थ्यांसाठी खुली), वाचलेल्या पुस्तकावर आठवड्यातून विचार व्यक्त करणे, दिसामाजी काहीतरी लिहावे या हेतूने ‘डायरी’ उपक्रम (दिवसभरात आलेला अनुभव, झालेला बोध, केलेल्या चुका याविषयी काहीतरी लिहावे लिखाणाची सवय लागावी या उद्देशाने), अक्षर संस्कार- शुद्धलेखनासोबतच सुलेखनावर भर देणारा उपक्रम, अध्ययन मित्र- कमी गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यास तेज गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांची जोडी देऊन समवयस्काकडून मार्गदर्शन, असे विविध उपक्रम राबविले आणि यशस्वी केले.
याशिवाय, विद्यार्थ्यामध्ये शिस्तीची आवड रुजावी यासाठी एनसीसीचे ग्वाल्हेर येथून 45 दिवसाचे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले व एनसीसी ऑफिसरची पदवी प्राप्त केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनातून दोन कॅडेट्सनी राज्यस्तरापर्यंत झेप घेतली. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श मराठी विषय शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्यांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.