*कोंकण Express*
*आंबोली येथील शासकीय जमिनीवरील अनधिकृत 27 बांधकामाबाबत मा. खासदार श्री. विनायकजी राऊत यांनी घेतली गंभीर दखल*
आंबोली येथील वने म्हणून नोंद असलेल्या एकूण 13 एकर शासकीय जमिनीवर 27 अनधिकृत बंगल्यांची बांधकामे सुरु आहेत. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या परंतू वन व महसूलच्या अधिकाऱ्यांनी काहीही दखल घेतली नाही. त्यानंतर ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरु आहे. ग्रामस्थांच्या विनंतीवरुन मा. खासदार श्री. विनायकजी राऊत यांनी अलिकडेच आंबोली येथील सदर शासकीय जमिनीवरील अनधिकृत बांधकामाची वन व महसूलच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी संबंधित वन व महसूलच्या अधिकाऱ्यांनी सदरची बांधकामे अनधिकृत असल्याचे मान्य केले आहे.
सदर प्रकरणी खासदार श्री. राऊत साहेब यांनी सदर आंबोली येथील शासकीय जमिनीवरील अनधिकृत बांधकाम प्रकरणी मा. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग – ओरोस, मा. कोकण आयुक्त, नवी मुंबई; मा. सचिव, महसूल विभाग, महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई; मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य नागपूर यांना पत्र देऊन त्यांचे लक्ष वेधले असून सदर अनधिकृत बांधकामे ताबडतोब तोडणे व अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वन व महसूलच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.