*कोंकण Express*
*फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूलच्या मराठी विभाग शिक्षिकाआर्या अनिल भोगले यांना आदर्श मराठी विषय शिक्षक पुरस्कार ” प्रदान*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ आणि शिक्षणमंत्री दीपकभाई केसरकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, सोहळ्यात फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूलच्या मराठी विभाग शिक्षिकाआर्या अनिल भोगले यांना, मराठी भाषेतील अपूर्व योगदानाबद्दल, “आदर्श मराठी विषय शिक्षक पुरस्कार” मान्यवरांचे उपस्थितीत प्रदान करून गौरविण्यात आले. ग्रंथ- सन्मानपत्र- सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दरवर्षी हा पुरस्कार मराठी भाषा दिनी देण्यात येतो. विद्यार्थ्यांची मातृभाषेतील विविध कौशल्य वृद्धिंगत व्हावीत, अभिव्यक्ती वाढावी, भाषा विषयात राबविलेले विविध प्रेरणादायी उपक्रम आणि वाचन संस्कृतीच्या चळवळीसाठी करीत जसलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेत, अध्यापक संघामार्फत हा गौरव करण्यात आला.. याबद्दल हायस्कूलचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षकवर्ग तसेच फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी आणि संचालक यांनी, सौ. भोगले यांचे अभिनंदन केले आहे.
यावेळी हा पुरस्कार मिळाल्यावर आर्या भोगले बाईंबद्दल बोलताना, विद्यार्थिनी- यशस्वी पेडणेकर व दिव्या नांचे यांनी, त्यांच्या
मराठी भाषेची आवड लावण्यासाठी घेतलेले विविध उपक्रम आणि शुद्धलेखन व सुंदर हस्ताक्षर यासाठीचे प्रयत्न, तसेच याचा आपल्या जीवनात घडलेल्या बदलाबद्दल, कौतुकपर मनोगत व्यक्त केले. आपण केलेल्या उपक्रमशील आणि विद्यार्थीभिमुख मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न, तसेच संचालक सहशिक्षक, पालक वर्ग, आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी दिलेल्या सहकार्यामुळे हा पुरस्कार मिळवू शकले, तसेच हा पुरस्कार कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी आणि मराठी भाषा दिनी मिळतो आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. असे उद्गार याप्रसंगी आर्या भोगले यांनी व्यक्त केले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे…