फोंडाघाट महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

फोंडाघाट महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

*कोंकण Express*

*फोंडाघाट महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी*

*शिवरायांचे धोरण हे सर्व जाती धर्माच्या कल्याणाचे होते!*
डॉ. राज ताडेराव*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित समारंभास प्रमुख वक्ते डॉ. राज ताडेराव होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमेस हार घालून अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आपल्या मनोगतात डॉ. राज ताडेराव म्हणाले की, छत्रपती शिवरायांचे कार्य महान होते. 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले. लोककल्याणकारी धोरणामुळेच स्वराज्यातील सर्व जाती धर्मातील जनतेला शिवरायांबद्दल प्रेम निर्माण झाले. त्यांनी महिलांचा सन्मान केला. गुन्हेगारांना शिक्षा देताना त्यांनी कोणाचाही मुलाहीजा ठेवला नाही. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला थारा दिला नाही. सर्व जाती धर्मातील लोकांबरोबर न्यायाची भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी आदर्शवत प्रशासन चालवले. त्यांच्या मावळ्यांमधील शिस्त आणि चांगल्या सवयींची धास्तीच मुघलांना होती. स्वराज्यातील सैन्य सर्व जाती धर्मातील सैन्य होते. अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तर मुस्लिम सैन्याकडे होत्या आणि म्हणूनच शिवराय हे कल्याणकारी राजे होते, असे प्रतिपादन त्यांनी केले

अध्यक्षीय मनोगतात डॉ. संतोष रायबोले म्हणाले की, समाज सुधारणा आणि राजकीय सुधारणा या दोन्ही गोष्टी छत्रपतीनी केल्या. इतिहासाची जर आपण नीट चाळणी केली तर असे लक्षात येते की, सर्व महान समाज सुधारकांमध्ये एक समान धागा होता. छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तनवादी होते. संतांच्या श्रेणीतील प्रजादक्ष राजा होते. गुरु शिष्य परंपरेत बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु ज्योतिराव फुले होते, फुलेंचे गुरु शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम होते आणि संत तुकाराम महाराजांचे गुरु गौतम बुद्ध होते. या गुरु शिष्य परंपरेने शोषणाविरहित समाजासाठी कधी तलवारी, कधी जनजागृती, शिक्षणाचा किंवा लेखणीचा आधार घेतला आहे. जय भवानी जय शिवाजी या घोषवाक्याचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणा देऊन चवदार तळ्याच्या सत्याग्रह व काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे जनतेचा एल्गार होय, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा जगदीश राणे यांनी तर आभार डॉ. राजाराम पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!