*कोंकण Express*
*थ्रीप्स रोगबाधित आंबा बागायतदारांना तात्काळ मिळावी नुकसानभरपाई ; बोगस औषधविक्रेत्यांवर करावी कारवाई*
*आंबा बागायतदारांच्या हितासाठी युवासेनेचा पुढाकार*
*युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन*
*ओरस ः प्रतिनिधी*
देवगड तालुक्यात ५ मिलिमिटर पेक्षा अधिक अवकाळी पाऊस झाल्याने आंबा पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.याचा बागायतदारांना आर्थिक फटका बसला आहे. या बागायतदारांचे सर्वेक्षण कृषी विभागामार्फत करण्यात येऊन आंबा नुकसान भरपाई अहवाल तात्काळ सादर करण्यात यावा तसेच आंबा बागायती करता हेक्टरी 7,000 व काजू बागायती करता हेक्टरी 12,000 एवढी शासनाकडून मदत दिली जाते. ती अत्यल्प असून आंबा नुकसान भरपाई ही प्रति झाडाप्रमाणे देण्यात यावी अशी मागणी उबाठा शिवसेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी देवगड युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, तेजस, राणे ,महेश राणे आदी उपस्थित होते. ज्याप्रमाणे तौक्ते वादळात सरसकट नुकसान भरपाई देण्यात आली त्याचप्रमाणे थ्रीप्स रोगावरही सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी.त्यात विम्याची अट असू नये ही आमची आग्रही मागणी आहे. तसेच सद्यस्थितीत आंबा, काजू बागायतीमध्ये माकडांचा त्रास मोठ्या प्रमाणात होत असून त्यावर आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी.
या मागण्याबरोबरच वारंवार आंबा पिकावर होणाऱ्या विविध रोगांचे आक्रमण किडीचा प्रादुर्भाव होत असून त्यात आंबा पिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे यावर संशोधन होण्याबाबत देवगड तालुक्यात विक्रीस उपलब्ध असलेल्या कीटक नाशकांची तपासणी करण्याकरिता व संबंधीत रोगांचे संशोधन करण्यासाठी प्रयोगशाळा निर्माण करण्यात यावी तसेच फळमाधी, फुलकिडा या रोगांचा समावेश पीकविमा योजनेअंतर्गत होत नसल्याने त्याचा नफा बागायतदारांना होत नाही. तरी या रोगांचा अथवा किडिंचा प्रादुर्भाव होणारे रोग यांचा समावेश या फळ पीकविमा योजनेअंतर्गत करण्यात यावा.तसेच थ्रीप्स रोगावर बोगस औषधांची विक्री करण्यात आली आहे.त्यामुळे शेतकरयांना याचा नाहक फटका बसला आहे. त्यामुळे बोगस औषधांची विक्री करणारऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी सुशांत नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.