*कोंकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात माता पालक मेळावा संपन्न*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मध्ये माता पालक मेळावा संपन्न झाला. महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षात मार्फत आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन फोंडाघाटच्या सरपंच सौ.संजना आग्रे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी व्यासपीठावर श्री. संजय आग्रे, चेअरमन श्री. सुभाष सावंत, संचालक राजू पटेल, श्री. सुंदर पारकर आदी उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकात सौ.विद्या मोदी म्हणाल्या की आपल्या पाल्याच्या जडणघडणीत मातांचा मोठा हातभार लागतो. आई आपल्या पाल्याच्या खूप जवळ असते. मानसिक व शारीरिक भावना तिच्या एवढ्या कोणालाही समजू शकत नाहीत. त्यामुळे मातानी आपल्या पाल्याची मैत्रीण होणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या मदतीने संस्कारची जोड गोळी आपल्याला गाठ करता येईल म्हणून या मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर सौ.संजना आग्रे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या की मातानी आपल्या पाल्याविषयी जागरूक राहिले पाहिजे. त्याच्या अभ्यासात त्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी नेहमी शिक्षकांच्या संपर्कात राहिले पाहिजे. त्याचबरोबर असे मेळावे वारंवार होणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षक व पालक यांच्यातील एक वेगळे नाते व ऋणानुबंध निर्माण होतात. असे प्रतिपादन केले.
त्याप्रसंगी सौ. संजना आग्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला.
मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत म्हणाले की या मेळाव्याला मातांनी दिलेला प्रतिसाद सकारात्मक विचाराचा भाग आहे. सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची केलेली मुहूर्तमेढ त्यांच्या आज आपल्याला रसाळ फळे दिसत आहेत. आपल्या पाल्याप्रती जागरूकता यातून दिसते. आपले पाल्य महाविद्यालय शिक्षण घेत असताना कोणत्या संस्कारातून जात आहे याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. फोंडाघाट सारख्या खेडेगावात अशी जाण असणे हे कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन केले. त्यानंतर मार्गदर्शन करताना डॉ. रश्मी पेंडुरकर म्हणाल्या की मुलींच्या दृष्टीने संस्कारिक जीवनात हे वय फार महत्त्वाचे आहे. अनेक मनस्थितीतून आपले पाल्य जात असते. अशावेळी योग्य संस्काराचा मार्ग सापडणे आवश्यक असते. मोबाईल रुपी राक्षसाला कशा पद्धतीने आपण हाताळतो हे महत्त्वाचे आहे. मोबाईल चांगलाच आहे परंतु त्याचा वापर काय आणि कसा करतो हे महत्त्वाचे आहे. टीव्हीवरील मालिकांनी समाज बिघडवण्याचे काम केले. घराघरात भांडणे आणि असंस्कारित गोष्टी करण्याचे काम केले. आपल्या महान संस्कृतीला छेद देणाऱ्या गोष्टी यात घडल्या. व्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. मुलगा मुलगी हा भेद असता कामा नये. जसे घरकाम मुलीला आले पाहिजे तसेच ते मुलाला पण आले पाहिजे. किमान पद्धतीचे जेवण मुलाला बनवता आलेच पाहिजे. त्यातून मुलांनाही स्वयंपूर्ण बनवता येते. मुलींमध्ये समाजात वावरताना आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. तिच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला येता नये.मुलींना व्रतवैकल्या उपवास यापेक्षा आपल्या हिमोग्लोबिनकडे लक्ष दिले पाहिजे. घरचे पदार्थ खा. बाकी कुरकुरे वगैरे खातो तो सगळा कचरा खात असतो. त्याच्या शरीराला काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे सकस आहार आपण खाल्ला पाहिजे. जगात खूप गोष्टी आहेत त्यातल्या चांगल्या गोष्टी निवडता आल्या पाहिजेत आणि त्यात मातांनी मैत्रीण बनून मार्गदर्शन केले पाहिजे. तरच मुलींना समाजात मान मिळेल. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला मातांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.त्याचे सूत्रसंचालन प्रा. कीर्ती पाटील यांनी केले तर आभार प्रा. रूपाली पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.