*कोंकण Express*
*पराभवाच्या भीतीने वैभव नाईक वैफल्यग्रस्त,गेल्या आठ वर्षांत एकही आमसभा नाही*
*खोटी भूमिपूजने आणि खोटे प्रवेश घेऊन स्वतःचीच समजूत घालण्याचा प्रयत्न:भाजपा कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल यांचे आवाहन*
*कुडाळ : प्रतिनिधी*
कुडाळ-मालवण विधानसभा क्षेत्रात सध्या निवडणूक प्रभारी निलेश राणे यांनी विविध विकासकामांबरोबर आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लावलेल्या धडाक्यामुळे या भागाचे कुचकामी आमदार वैभव नाईक सध्या वैफल्यग्रस्त झाले आहेत. जर विद्यमान आमदारांनी जनतेचे प्रश्न सोडवले असतील आणि तुमच्या कार्यकाळात जनतेला न्याय देणारी कामे झाली असतील तर गेल्या तब्बल आठ वर्षात एकही आमसभा घेण्याचे धाडस का केले नाही? याचे उत्तर वैभव नाईक यांनी द्यावे आणि हिम्मत असेल तर आमसभा घेऊनच दाखवावी असे आवाहन भाजपाचे कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी केले आहे.
वैभव नाईक यांच्या कारकिर्दीत अडकलेल्या अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडून ते मार्गी लावण्यासाठी भाजपा नेते मान.निलेशजी राणे हे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील आहेत. विद्यमान महायुती सरकारच्या माध्यमातून निलेश राणे यांनी गेल्या आठ वर्षात वैभव नाईक यांच्या कारकिर्दीतील अनेक विकासकामे मार्गी देखील लावली आहेत. त्यामुळे कुडाळ- मालवणच्या जनतेने आता विधानसभेमध्ये बदल घडवण्याचे संकेत दिलेले असून त्यामुळेच विद्यमान आमदार वैभव नाईक हे वैफल्यग्रस्त झाले असून महायुती सरकारच्या माध्यमातून मंजूर विकासकामांचे श्रेय लाटण्याचे केविलवाणे प्रयत्न करत आहेत.
वस्तुतः आमदार वैभव नाईक यांचे मालक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना एकही विकासकाम मंजूर करून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून घेता आली नाही हे त्यांचे अपयश म्हणायचे की उद्धव ठाकरे यांचे वैभव नाईकांवर उपकार म्हणायचे असा संभ्रम जनतेला पडला आहे. वैभव नाईक जर म्हणत असतील मी विकासकामे मंजूर केली तर त्या कामांना आवश्यक निधीची तरतूद कोणत्या सरकारच्या काळात झाली हे देखील त्यांनी जनतेला सांगावे. कारण विद्यमान सरकार हे महायुतीचे असून पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे निलेश राणेंच्या शिफारशीनुसार कुडाळ-मालवणमधील सर्व विकासकामे मंजूर करण्यासाठी निधीची तरतूद करून देत आहेत.
त्यामुळेच विद्यमान आमदार वैभव नाईक यांना मतदारसंघातील त्यांचे कमी होऊ लागलेले महत्त्व लक्ष्यात आल्यावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांचे खोटे प्रवेश घेण्याचे देखील सत्र चालू केले आहे. आताची जनता आणि मतदार हे सुज्ञ असून कोणीही बुडत्या नावेत बसण्याचे धाडस करणार नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची नौका कधीही बुडू शकते हे जनतेला चांगलेच माहित आहे त्यामुळे या अशा पक्ष नसलेल्या आणि कर्तुत्व नसलेल्या पक्षात कोण कशाला प्रवेश करेल? त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांचा वैभव नाईक यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश हे एक विनोदी नाटक म्हणून आता कुडाळ-मालवणमध्ये प्रसिद्ध होत आहे, असा टोला देखील दादा साईल यांनी लगावला आहे.