*कोकण Express*
*आयुष्यात शिस्त महत्त्वाची ; डॉ.प्रसाद देवधर*
*कासार्डे विद्यालयातील वार्षिक बक्षिस वितरण समारंभात प्रतिपादन*
*कासार्डे प्रतिनिधी: संजय भोसले*
आयुष्यात शिस्त महत्वाची आहे. पुढे जायचे आहे त्याला शिस्त पाळली पाहिजे.आणि कोणतेही काम करत असताना पद, प्रतिष्ठा आड येता कामा नये, असे प्रतिपादन भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. प्रसाद देवधर यांनी व्यक्त केले.
ते कासार्डे विकास मंडळ, मुंबई संचलित कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे च्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड,डॉ.प्रसाद देवधर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व कासार्डे विकास मंडळाचे अध्यक्ष परशुराम माईणकर यांच्या हस्ते सरस्वतीच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कासार्डे विकास मंडळ मुंबई चे अध्यक्ष परशुराम माईणकर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड ,
स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,शिक्षण समिती चेअरमन अरविंद कुडतरकर, जि.प.सदस्य संजय देसाई ,प.स. सदस्य प्रकाश पारकर,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रवीण पाताडे,उपसरपंच गणेश पाताडे,सत्कारमुर्ती शिक्षक चंद्रशेखर कल्याणकर, मुख्याध्यापक एम.डी. खाडये यांच्यासह कासार्डे विकास मंडळ मुंबईचे कार्यकारीणी पदाधिकारी,स्कुल कमिटीचे पदाधिकारी,स्थानिक व्यवस्था समितीचे पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना डॉ. देवधर पुढे म्हणाले की, भविष्यात आव्हाने ही अंतर्गत लोकांची असणार आहेत. त्यांच्याशी लढायचे असेल तर आपल्या सर्वांनी बदलले पाहिजे. सर्वांनी अंतर्मुख झाले पाहिजे. त्याचवेळी विकासाची प्रक्रीया सुरु होईल. लोकं अनुकरणीय असतात त्यामुळे उपदेश देण्यापेक्षा कृती केली पाहिजे. शिवाय,कमी शिकून अधिक चांगला माणूस कसा बनेल यासाठी प्रयत्न करा.
*आयुष्य गांभीर्याने घेतले पाहिजे – अजयकुमार सर्वगोड*
कार्यक्रमाचे अध्यक्ष अजयकुमार सर्वगोड मार्गदर्शन करताना म्हणाले की,बुध्दिजीवी लोकं राजकरणात नाहीत,त्यामुळे सामाजिक परिस्थिती विस्कळीत झाली आहे. त्यासाठी सज्जनांची ताकद वाढविण्याची गरज आहे. आयुष्य हे गांभीर्याने घेतले पाहिजे. त्यासाठी शिस्त महत्वाची असून आचरण श्रेष्ठ व शुध्द असले पाहिजे असाही त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपदेश केला.
*विविध कर्मचारी, विद्यार्थ्यांचा गौरव*
यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या “मेघदूत” या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, याप्रसंगी शाळेच्या विकासातील भरीव योगदानाबद्दल संस्थेचे माजी कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.या बरोबर उपक्रमशील शिक्षक पुरस्कार सौ. ऋचा सरवणकर यांना सन्मानचिन्ह,शाल व श्रीफळ देऊन तर वर्षभरातील शैक्षणिक,कला,क्रीडा व इतर उपक्रमातील गुणवंत विद्यार्थी,10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोख रक्कम,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विविध संस्थांमार्फत देण्यात आलेल्या आदर्श मुख्याध्यापक , उपक्रमशील शिक्षक यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान झाला तसेच, विद्यालयचे सेवानिवृत्त कला शिक्षक चंद्रशेखर कल्याणकर यांचा शाल ,श्रीफळ, सोन्याची अंगठी,चांदीची गणेश मुर्ती देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.दरम्यान संस्थेचे अध्यक्ष परशुराम माईणकर, उपसचिव आनंद कासार्डेकर, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, प्राचार्य एम.डी.खाडये, सत्कारमुर्ती सी.एस.कल्याणकर, जेष्ठ शिक्षिका सौ. बी.बी.बिसुरे, क्रीडा शिक्षक डी.जे. मारकड आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी उपस्थित पाहुण्यांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र.मुख्याध्यापक एन.सी.कुचेकर, अहवाल वाचन प्र.पर्यवेक्षक एस. डी.भोसले, सूत्रसंचालन आर.व्ही.राऊळ यांनी तर एस.व्ही.राणे यांनी आभार मानले.