*कोकण Express*
*संकल्प प्रतिष्ठान द्वारा काजू प्रक्रिया – एक उद्योगसंधी या विषयावर कणकवली येथे मोफत मार्गदर्शन*
गेली १२ वर्षे या संस्थेद्वारा उद्योग व्यवसाय व कृषी विषयक विविध उपक्रम राबविले जात आहेत. यात मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश आहे. याचा अनेकांनी लाभ घेऊन आपले उद्योग/व्यवसाय सुरू केले आहेत व इतरांना ही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
नुकतेच काजू प्रक्रिया – एक उद्योगसंधी या विषयावर
मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोकणात काजू उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असून प्रक्रिया न करता काजूबी परराज्यात त्वरित विक्री केला जातो. या काजूबी वर प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास या उद्योगसंधी मुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते.
आता काजूबी वर्षभर उपलब्ध होते, त्याचबरोबर काजूगरांनाही वर्षभर मागणी असते. तसेच काजूगरापासून अनेक मूल्यवर्धित उत्पादने तयार करता येतात.
काजूप्रक्रिया – उद्योग एक संधी अनेक असंही म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
या कार्यक्रमात
• काजूप्रक्रिया – उद्योगसंधी कशी ?
• हा उद्योगाची पूर्वतयारी कशी करावी ?
• कच्चा मालाचे नियोजन कसे करावे ?
• काजूगरांसाठी मार्केट आहे का ?
• या उद्योगासाठी शासकिय कर्ज व अनुदान योजना आहेत का ?
• या उद्योगासाठी आवश्यक मशिनरी कोणती ? कुठे मिळते ?
• आवश्यक परवाने कोणते ? इत्यादी विषयांवर या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर रत्नागिरी, मुंबई, कोल्हापूर येथील सुमारे ५१ प्रशिक्षणार्थींनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन काजूप्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी अंकुश सावंत, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरादअली शेख, सचिव अमोल भोगले व समन्वयक अमोल परब आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
तसेच गेली २५ वर्षे काजूप्रक्रियेसाठी आवश्यक मशीनरीचे उत्पादन करणाऱ्या कुडाळ एमआयडीसी येथील एक्यूरेट इंजिनिअरींग इंडस्ट्रीजचे कौसर खान यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणार्थींनी या नाविन्यपूर्ण अशा उपक्रमाची प्रशंसा करून संकल्प प्रतिष्ठानचे आभार मानले.