*कोंकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता “पॉझिटिव्ह अँगल”ची ; दिपक केसरकर*
*पत्रकार भवनाच्या खर्चासाठी आपण पुढाकार घेणार…*
*ओरोसः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता “पॉझिटिव्ह अँगल”ची आहे. त्यामुळे येथील विकासाला बळ देण्याबरोबरच राजकारण्यांना लगाम आणि समाजाला दिशा देण्याचे काम केले, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. दरम्यान जिल्ह्यातील पत्रकार भवनाच्या डागडुजीच्या खर्चासाठी आपण पुढाकार घेवून आर्थिक तरतूद करणार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. आज येथे आयोजित जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रमुख वक्ते तथा जेष्ठ पत्रकार वसंत भोसले, आमदार वैभव नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, संघ सचिव देवयानी वरसकर, तसेच जिल्हा बैंक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजय सर्वगोड, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चीलवंत, माधव कदम, गणेश जेठे, संतोष वायंगणकर, नंदकिशोर महाजन, बाळ खडपकर, विद्याधर केनवडेकर, रमेश जोगळे, महेश सरनाईक, संतोष राऊळ, संतोष सावंत, महेश रावराणे, दाजी नाईक, संदीप देसाई, लखु खरवत, महेश रावराणे आदी उपस्थित
होते.
यावेळी केसरकर पुढे म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांचे भवन उभारण्याचे स्वप्न साकार झाले आहे. हे भवन म्हणजे बाळशास्त्री यांना खरी श्रद्धांजली आहे. त्यांचा जन्मगाव असलेल्या पोंभुर्ले गावाला पुस्तकांचे गाव म्हणून दर्जा मिळाला आहे. जिल्ह्यातील पत्रकारिता वेगळ्या उंचीची पत्रकारिता आहे. शासन योजनेत पत्रकारांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. समाजाचा आरसा पत्रकार असतो. या जिल्हा एवढे विकासाचे मार्ग अन्य जिल्ह्यांत नाहीत. पत्रकार भवनसाठी आवश्यक निधी संकलनासाठी लागणारे सर्व योगदान १०० टक्के देईन, असे यावेळी बोलताना सांगितले. आ नाईक यांनी ‘बाळशास्त्री जिल्ह्याचे सुपुत्र असल्याचा अभिमान आहे. त्यांचा वारसा जपणाऱ्या जिल्ह्यातील पत्रकारांनी आपली पत्रकारीता स्वस्त होवू देवू नये. पत्रकारांनी आपला दर्जा कमी करून घेवू नये, असे आवाहन केले. यावेळी ज्येष्व पत्रकार भोसले यांनी, युती आणि आघाडीचे राजकारण सुरू झाल्यावर राज्याची घसरण सुरू झाली आहे, असे ठाम मत व्यक्त केले.