राज्यस्तरीय ‘दर्पण’पुरस्काराचे वितरण

राज्यस्तरीय ‘दर्पण’पुरस्काराचे वितरण

*कोकण Express*

*राज्यस्तरीय ‘दर्पण’पुरस्काराचे वितरण*

*पत्रकारांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य*

*पालकमंत्री रविंद्र चव्हाण*

*सिंधुदुर्गनगरी, दि.6 (जि.मा.का):*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले गाव ही आद्य मराठी पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मभूमी आहे, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकार क्षेत्रातील महापुरुष होते. आचार्य जांभेकर यांनी इंग्रजांच्या जुलमी राजवटीत सर्वप्रथम पहिले दर्पण वृत्तपत्र सुरू केले. ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटी विरोधात ते तेव्हापासूनच लढत होते. दर्पण म्हणजेच आरसा, आचार्य जांभेकर हे पत्रकारितेचे खरे दर्पण आहेत. तेव्हापासून पत्रकारितेला समाजात अनन्य साधारण महत्त्व आहे. पत्रकार हा समाजातील समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी उपाय सूचवित असतो. आज पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.

पत्रकार दिनानिमित्त पोंभुर्ले येथे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी समितीचे राज्यस्तरीय पत्रकार दिनानिमित्त आयेाजित राज्यातील ज्येष्ठ व गुणवंत पत्रकारांना ‘दर्पण’ कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मरणार्थ राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार वितरण समारंभ पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी समितीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, जिल्हाधिकारी किशोर तावडे, सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, मराठवाडा विभाग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, अलका बेडकिहाळ, पोंभुर्ले गावच्या सरपंच प्रियंका धावडे, उपसरपंच सादिक डोंगरकर, मधुकर जांभेकर, सुधाकर जांभेकर, बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर, विजय मांडके तसेच पोंभुर्ले, जांभे-देऊळवाडी ग्रामस्थ व जांभेकर कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पालखीचे पूजन करून मिरवणूक काढण्यात आली. तसेच राज्यातील ज्येष्ठ व गुणवंत पत्रकारांना दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘दर्पण स्मरणिकेचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

पालकमंत्री म्हणाले, पत्रकारिता हा लोकशाहीतील चौथा स्तंभ मानला जातो. आपल्या समाजात चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात, त्याचे प्रतिबिंब बातम्यांमधून दिसत असते. त्यामुळे पत्रकार हा खरा समाज मनाचा आरसा आहे. हे लक्षात घेत आचार्य जांभेकर यांचे कर्तृत्व व त्यांची मूल्ये पत्रकारांनी आपल्या कामात नेहमीच रुजवली पाहिजेत. पत्रकाराचे काम हे नेहमीच समाजभिमुख व समाज उपयोगी असले पाहिजे. मराठी साहित्य संस्कृती मंडळाच्यावतीने प्रकाशित होणारा त्यांच्या जीवनावरील चरित्र ग्रंथ सर्व पत्रकारांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे जेणेकरुन आजच्या पिढीला त्यांच्या कार्यातून मार्गदर्शन मिळेल. शासन पत्रकारांसाठी अनेक योजना राबवित आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 11 हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यात येतो. मुंबईमध्ये आचार्य जांभेकरांच्या स्मारकासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावण्यात येईल आणि या बैठकीच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात येईल असेही श्री चव्हाण म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात समितीचे अध्यक्ष श्री बेडकिहाळ यांनी जांभेकरांच्या कार्याची माहिती दिली. जांभेकरांच्या जीवन चरित्रावर आधारित तीन खंडाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सन 2023 चे ‘दर्पण’ पुरस्कार प्राप्त पत्रकार-

1. जीवन गौरव पुरस्कार- ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, सिंधुदुर्ग

2. राज्यस्तरीय ‘दर्पण ‘ पुरस्कार- प्रशांत कदम -नवी दिल्ली, सागर देशपांडे- पुणे, कैलास म्हापदी-ठाणे, श्रीकांत कात्रे-सातारा,

3. धाडसी पत्रकार पुरस्कार- कृतिका पालव, मुंबई

4. साहित्यिक गौरव पुरस्कार- डॉ. भगवान अंजनीकर, नांदेड

5. विशेष दर्पण पुरस्कार- शशिकांत सोनवलकर दुधेबावी ता. फलटण आणि विक्रम चोरमले, फलटण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!