*कोकण Express*
*शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन*
अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे. महाडिबीटी पोर्टलव्दारे पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यावर शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता, शिक्षण शुल्क थेट वितरीत करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी अर्ज भरण्याबाबत जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करावे. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभाविषयक माहिती संबंधित संस्थांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावी. महाविद्यालयाने याबाबतच्या तात्काळ कार्यवाही करावी व आपल्या संस्थेतील पात्र असणारा एकही मागासवर्गीय विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी.
संबंधित विद्याथ्यांनी अर्ज भरावयाची कार्यवाही तात्काळ करावयाची आहे व अशा विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण स्वरूपातील अर्ज छाननी केलेले अर्ज महाविद्यालयांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास ऑनलाईनरित्या सादर करावयाचे आहेत.
महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीमधून महाविद्यालयास देय असणारे शिक्षण शुल्क त्यांच्या खात्यावर अलहिदा जमा केले जाणार आहेत.
त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी आकारणे करू नये व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची पिळवणुक होणार नाही याची दक्षता घ्यावी.
महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळाचा वापर करावा.
अडचण आल्यास 022-49150800 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही समाज कल्याण विभागाने केले आहे.