*कोकण Express*
*शिराळे गावच्या गावपातळीला सुरुवात;सडुरेच्या जंगलात थाटला संसार…………*
*पाळीव प्राणी पशुपक्ष्यांसह आणि लागणारा धान्याचा साठा घेऊन नजिकच्या सडुरे गावच्या हद्दीत थाटली वस्ती……..*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
सुमारे४५० वर्षाची परंपरा जपणा-या शिराळे गावच्या गावपळणीला शुक्रवारपासून सुरूवात झाली. गावपळणी दरम्यान शिराळेवासिय पाळीव प्राणी पशुपक्ष्यांसह आणि लागणारा धान्याचा साठा घेऊन नजिकच्या सडुरे गावच्या हद्दीत दडोबा डोंगराच्या पायथ्याशी चिमुरड्यांसह वयोवृध्दही सहभागी झाले आहेत. वैभववाडी तालुक्यातील शिराळे गाव वैभववाडी शहरापासून सुमारे १५. कि. मी. अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. या गावातील जागृत देवस्थान असलेल्या श्री. गांगेश्वर देवाच्या हुकुमाने ही गावपळण होते. गावपळण दरवर्षी पौष महिन्यात कडाक्याच्या थंडीमध्ये होते. ही गावपळण म्हणजे गांगो देवाचे वार्षिक समजतात. पौष महिन्यामध्ये होत असलेली ही गावपळण पाच, तीन किंवा सात दिवसांची असते. तीन दिवस झाल्यानंतर गांगोला कौल लावून देवाने हुकूम दिल्यानंतर शिराळेवासिय गावात परततात. यावेळी शुक्रवारपासून गावपळणीला सुरूवात झाली आहे. शिराळेवासिय गावपळणी दरम्यान लागणारा धान्य साठा, जनावरे, पक्षी या सर्व गोष्टी घेऊन गावाबाहेर जातात. व सडुरे गावच्या हद्दीमध्ये म्हणजे दडोबाच्या पायथ्याशी मोकळ्या माळरानावर झोपड्या बांधून वास्तव्य करतात. गावपळणीच्या अगोदर एक दिवस आधी घरामध्ये गोड जेवण किंवा मांसाहारी जेवण करुन बाहेर पडतात. शिराळेवासिय शुक्रवारी सकाळी घरामध्ये जेवण करुन दुपारनंतर घरातून बाहेर पडतात. ज्या दिवशी घरातून बाहेर पडतात. तो दिवस गृहीत धरला जात नाही. कारण घरातील चुलीमध्ये अग्नी(विस्तव)असतो.