समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचा इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार ज्येष्ठ अभ्यासक चंद्रकांत वानखडे यांना जाहीर

समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचा इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार ज्येष्ठ अभ्यासक चंद्रकांत वानखडे यांना जाहीर

*कोकण Express*

*समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचा इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार ज्येष्ठ अभ्यासक चंद्रकांत वानखडे यांना जाहीर*

*प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, कार्यवाह वैभव साटम यांची माहिती*

*कणकवली/प्रतिनिधी*

समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणारा सिंधुदुर्ग (केळुस) सुपुत्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले गुरू इतिहासकार कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार ज्येष्ठ लेखक,संपादक,विचारवंत, ‘गांधी का मरत नाही’ या बहुचर्चित ग्रंथाचे लेखक चंद्रकांत वानखडे (नागपूर) यांना जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये, स्मृती चिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असून डिसेंबर मध्ये मुंबई येथे होणाऱ्या समाज साहित्य संमेलनात सदर पुरस्काराने श्री वानखडे यांना गौरविण्यात येणार आहे.अशी माहिती समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, प्रमुख कार्यवाहक वैभव साटम यांनी दिली.
या पुरस्कार योजनेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस, समीक्षक प्रा.डॉ.नितीन रिंढे, प्रा.डॉ.रणधीर शिंदे यांनी काम पाहिले. यापूर्वी हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे यांना प्राप्त झाला होता. गुरुवर्य केळुसकर हे केळुस गावचे. एक आद्य इतिहासकार अशी त्यांची ओळख आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते पहिले गुरू. त्यांनी शिवचरित्र आणि बुद्ध चरित्र प्रथम लिहिले. हे दोन्ही ग्रंथ बाबासाहेबांना त्यांनी दिले आणि बाबासाहेब बुद्ध विचाराकडे वळले. अलीकडेच गुरुवर्य केळुसकर यांचे समग्र वाड: मय साहित्य – संस्कृती मंडळातर्फे नव्याने संपादित करून प्रसिद्ध करण्यात आले. अशा या महान इतिहासकाराच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दरवर्षी दिला जात असून यावर्षीच्या सदर पुरस्काराने विचारवंत चंद्रकांत वानखडे यांना गौरविण्यात येत आहे. श्री वानखडे हे ज्येष्ठ लेखक, संपादक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते असून ‘गांधी का मरत नाही ‘ हा त्यांचा ग्रंथ बहुचर्चित झाला असून त्याच्या अनेक आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याचबरोबर त्यांची इतर अनेक पुस्तकेही गाजली आहेत. स्पष्टवक्तेपणा आणि चिकित्सक पद्धतीने अभ्यास या त्यांच्या अभ्यासू स्वभाव वैशिष्ट्यामुळे परीक्षकांनी त्यांची गुरुवर्य केळुसकर पुरस्कारासाठी निवड केली असल्याची माहितीही श्री मातोंडकर आणि प्रा साटम यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!