*कोकण Express*
*ग्रामीण भागातील नागरिकांना एसटीची सेवा सुरळीत द्या*
*वेळेत गाड्या सोडा, वस्तीच्या गाड्या नियमित करा; रांजण तेली यांचे एसटी प्रशासनाकडे मागणी…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
एसटीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील लोकांना चांगली सेवा द्या. विशेष करुन वेळेत गाड्या सोडा, मुलांचे नुकसान होवू नये यासाठी वस्तीच्या गाड्या नियमित करा, अशी मागणी आज येथे भाजपाच्या माध्यमातून माजी आमदार राजन तेली यानी एसटीचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्याकडे केली. दरम्यान या ठिकाणी राजकीय लोकांनी विरोध केला म्हणून कोणत्याही गाड्या थेट बंद करू नका. तर तेथील प्रवाशांची मते आणि भारमान लक्षात घेवून योग्य तो निर्णय घ्या, अशा सुचना त्यांनी यावेळी एसटी प्रशासनाला दिल्या..
श्री. तेली यांच्या उपस्थितीत आज सावंतवाडी एसटी आगारात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी एसटीचे अधिकारी श्री. पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्या आणि तेथील राजकीय आणि प्रवाशांकडून करण्यात आलेल्या मागण्या लक्षात घेता त्यांनी मागणीनुसार आढावा घेतला यावेळी काही गाड्या तेथील सरपंचांनी नकार दिल्याने बंद करण्यात आल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत श्री. तेली यांनी नाराजी व्यक्त केली. अशा पध्दतीने कोणी सांगितले म्हणून थेट गाड्या बंद करणे चुकीचे आहे. त्यामुळे तेथील प्रवाशांची मते आणि भारमान लक्षात घेवून निर्णय घ्या, • अशा सुचना दिल्या.
यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी गावात जाणाऱ्या गाड्या वेळेत सोडल्या जात नाहीत. त्याचा फटका विशेषतः महाविद्यालयात येणाऱ्या तसेच शाळकरी मुलांना बसतो. त्यामुळे याबाबत योग्य ते धोरण ठरविण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी सर्वांच्या सुचना लक्षात घेता आपण योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन श्री. पाटील यांनी दिले. यावेळी उपस्थित अन्य एसटी अधिकान्यांशी पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. तसेच तीनही तालुक्याच्या आगारातून प्रवाशांना चांगली सेवा मिळावी यासाठी प्रयत्न केले जावेत, अशा सुचना केल्या.