*कोकण Express*
*विस्थापित नवीन कुर्ली गावठणील प्रलंबित समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनी ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण-*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे सुमारे २५ वर्षापुर्वी लोरे- फोंडा माळरानावर पुनर्वसन होऊन अद्यापही प्रकल्पग्रस्त प्रमुख नागरी सुविधापासुन वंचित आहेत. शासन दरबारी वारंवार दाद मागुनही शासनाने प्रकल्पग्रस्तांची घोर निराशाच केली आहे,म्हणुन प्रकल्पग्रस्तांच्या नवीन कुर्ली गावठण येथील प्रलंबित मागण्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्याकरीता येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधदुर्ग येथे नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ (रजि.) च्या नेतृत्वाखाली गावातील ग्रामस्थांचे एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे,याबाबतचे निवेदनही जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहे.
नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाच्या नेेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे कि देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत विस्थापित प्रकल्पस्तांचे पुनर्वसन १९९५ साली फोंडा- लोरे गावठण (नवीन कुर्ली) या ठिकाणी करण्यात आले त्याचबरोबर नवीन कुर्ली हे महसुली गाव म्हणुन जिल्हाधिका-यांच्या राजपत्रात २००२ साली घोषीत करण्यात आले. शासनाच्या प्रचलित पुनर्वसन कायदा या प्रकल्पास लागु असुनही पुनर्वसन गाठवण येथील प्रमुख १८ नागरी सुविधांच्या पुर्ततेबाबत पुनर्वसन यंत्रणेबाबत जाणुन- बुजुन दुर्लक्ष करण्यात येत आहे. गेली २२ वर्षे प्रकल्पग्रस्त शासनस्तरावर वारंवार प्रलबिंत समस्यांबाबत सातत्याने पाठपुरवा करतात परंतु शासनस्तरावरुन आश्वासनाच्या व्यतिरिक्त कोणत्याही मागण्याची पुर्तता केली गेलेली नाही.
प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यामध्ये नवीन कुर्ली येथे तात्काळ नवीन ग्रामपंचायत स्थापन करणे,उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यायी शेत जमिन देय असल्याने ती त्वरीत देण्यात यावी,प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावुन घेणे तसेच प्रमुख १८ नागरी सुविधा तात्काळ पुर्ण कराव्यात अशा प्रमुख मागण्या आहेत तसेच या उपोषणाची शासन स्तरावर दखल न घेतल्यास या उपोषणाचे साखळी उपोषणात रुपांतर करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे.