ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध करून कोकणवासीयांचा रोजगार बुडवणाऱ्या खासदाराला निवडणुकीत जनताच बुडवणार

ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध करून कोकणवासीयांचा रोजगार बुडवणाऱ्या खासदाराला निवडणुकीत जनताच बुडवणार

*कोकण Express*

*ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध करून कोकणवासीयांचा रोजगार बुडवणाऱ्या खासदाराला निवडणुकीत जनताच बुडवणार*

*रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा १९ ऑक्टोबर रोजी दौरा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यव्यापी लोकसभा दौऱ्यानुसार रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ ऑक्टोबर २०२३ रोजी दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ‘घर चलो अभियान’राबविण्यात येणार आहे .तसेच विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या ३०० कार्यकर्त्यांची बैठक दोन्ही जिल्ह्यांमध्ये होणार आहे. या दौऱ्याचा समारोप सावंतवाडीत भाजपा कार्यालयाचे उद्घाटन करून होणार आहे. त्यानंतर पुढीलकाळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रिय गृहमंत्री अमित शाह तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही दौरे होणार असल्याची माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली. तर येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनता खासदार राऊत यांना जशासतसे उत्तर देईलच. परंतु आम्हीही त्यांना समुद्रात डुबवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार कणकवलीतील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, मिडिया जिल्हा समन्वयक बबलू सावंत उपस्थित होते.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार म्हणून प्रमोद जठार यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, उमेदवारीबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. पुढील खासदार हा महायुतीचाच असेल. आपणास उमेदवारी मिळो अथवा न मिळो आपण जनसेवेचे व्रत हाती घेतले आहे ते सुरूच ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिंदे गटाचे किरण सामंत हेही या मतदारसंघासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. याबाबत प्रमोद जठार यांना विचारले असता ते म्हणाले, उमेदवारीबाबतचा निर्णय महायुतीचे निर्णय एकत्रितपणे घेतले जातील.

पुढे बोलताना ते म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खा. विनायक राऊत यांनी मुंबई-गोवा महामार्ग प्रश्नी जो समन्वय ठेवायला हवा होता तो ठेवला नाही. त्यांनी या प्रश्नांबाबत काहीच केले नाही. त्यांच्या हलगर्जीपणामुळे रत्नागिरीमधील हायवेचे काम रखडले आहे. रोजगाराच्या प्रश्नातही त्यांनी खोड्या घालण्याचेच काम केले. त्याशिवाय पर्यटनासह केंद्र शासनाच्या अनेक योजना त्यांनी व्यवस्थितरित्या, जबाबदारीपूर्वक राबविल्या नाहीत. त्यांच्या निष्काळजीपणामुळे अनेक कामे रखडली. येत्या २०२४ च्या निवडणुकीत त्यांना जनता जशासतसे उत्तर देऊन सरळ घरी बसवेल अशी टिका देखील श्री.जठार यांनी खा. राऊत यांच्यावर केली.

आज कोकणात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो रोजगाराचा, ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष दीड लाख लोकांना नोकऱ्या मिळणार होत्या. ६ हजार बायप्रोडक्ट येणार होते. मात्र, खा.विनायक राऊत यांनी सातत्याने स्थानिक जनतेची दिशाभूल करून ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला. ज्यांनी कोकणवासीयांचा रोजगार बुडवला त्यांना निवडणुकीत जनताच बुडवणार असल्याची टीका देखील माजी आ. प्रमोद जठार यांनी केली.

सी-वर्ल्ड सारखे अनेक प्रकल्प असो की अन्य प्रकल्प, तसेच विकासाच्या प्रकल्पांना विरोध करण्याचे काम खा. राऊत यांनी केले. केंद्राकडे ज्या ताकदीने पाठपुरावा करण्याची गरज होती तो त्यांनी केला नाही. खा. राऊत हे जनताद्रोही आहेत. हायवेच्या प्रश्नी सिंधुदुर्ग असो किंवा चिपळुण असो, तसेच संगमेश्वर, राजापूर येथील अनेक समस्या सोडविण्यासाठी आपण काम केले. टोल वसुलीला आमचाही विरोध आहे. खा. विनायक राऊत यांनी हायवेचे प्रश्न सोडविले नाहीत परंतु टोल कंत्राटासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे. रायगडमधील टोल कंत्राट खा.राऊत यांनी मिळविल्याचा दावा देखील श्री. जठार यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!