महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव समन्वय समितीने पुकारला एल्गार : 13 ला निघणार जिल्ह्यातील सर्व संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव समन्वय समितीने पुकारला एल्गार : 13 ला निघणार जिल्ह्यातील सर्व संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

*कोकण Express*

*महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव समन्वय समितीने पुकारला एल्गार : 13 ला निघणार जिल्ह्यातील सर्व संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

महाराष्ट्र शासनाने शिक्षण क्षेत्रात बदल करणारे वेगवेगळे शासन आदेश काढून शिक्षण क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने समूह शाळा योजना, शाळा दत्तक योजना, शाळांचे खाजगीकरण, सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण अशा प्रकारच्या शासन निर्णयाचा समावेश असून याला विरोध करण्यासाठी व शिक्षण क्षेत्र वाचविण्यासाठी या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव समन्वय समितीच्या वतीने येत्या १३ तारखेला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर व महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त कार्यालयावर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव समन्वय समितीचे समन्वयक शिवाजी खांडेकर यांनी दिली.

या मोर्चाच्या अनुषंगाने राष्ट्रसेवा दलाचे रावसाहेब पटवर्धन हायस्कूल पर्वती पायथा, पुणे येथे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये भविष्यातील आंदोलनाची व मोर्च्याची रूपरेषा ठरविण्यात आली. शनिवार वाड्यापासून सदर मोर्चाला सुरुवात होऊन शिक्षण आयुक्त यांना निवेदन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्यायकारक सर्व शासकीय आदेशांची होळी करून मोर्चाची सांगता होणार आहे. त्याचप्रमाणे या आंदोलनामध्ये विद्यार्थी व पालकांना सुद्धा सहभागी करून जिल्ह्यातील सर्व शाळातील विद्यार्थ्यांकडून या विरोधात राज्यपाल यांच्याशी पत्रव्यवहार करून निषेध व्यक्त केला जाणार आहे.

यावेळी या बैठकीस पुणे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील जवळपास ३० ते ३२ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे संपादक, शरद जावडेकर, संस्थाचालक महामंडळाचे आप्पा बालवडकर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुजित जगताप, सचिव शिवाजीराव कामथे, पुणे जिल्हा जुनी पेन्शन हक्क योजनेचे फापाळे, महाराष्ट्र राज्य समुपदेशक संघटनेचे विजयराव कचरे, कनिष्ठ महाविद्यालय टीडीएफचे अध्यक्ष प्रा. शशिकांत शिंदे, कामठे पुणे शहर टीडीएफचे अध्यक्ष प्रा. संतोष थोरात, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्राचार्य राज मुजावर, महिला अध्यक्षा भारती राऊत, शिक्षकेतर महामंडळाचे प्रसन्न कोतुळकर ,देवेंद्र पारखे, मान्य खाजगी प्राथमिक महासंघाचे विकास थिटे, शारीरिक शिक्षक महासंघाचे शरदचंद्र धारूरकर, कलाध्यापक संघाच्या अश्विनी कदम, महाराष्ट्र राज्य पदवीधर डीएड संघटनेचे सचिव महादेव माने, जुनिअर कॉलेज शिक्षक संघटनेचे डॉ. संतोष बिराजदार, माध्यमिक शिक्षक संघ, पुरंदरचे सचिव दत्ता रोकडे, माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दत्ता हेगडकर तसेच अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी शुक्रवार दि.१३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून, सर्व शिक्षक बंधू भगिनींनी यामध्ये सहभागी होऊन एकमताने हा भव्य मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!