फोंडाघाट श्री देव राधाकृष्ण मंदिरात उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह

फोंडाघाट श्री देव राधाकृष्ण मंदिरात उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह

*कोकण Express*

*फोंडाघाट श्री देव राधाकृष्ण मंदिरात उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह*

*फोंडाघाट ः संजना हळदिवे*

बाजारपेठेतील श्री देव राधाकृष्ण मंदिरामध्ये भाद्रपद व. पष्ठी ते एकादशी अर्थात बुधवार तारीख ४ ते मंगळवार तारीख १० ऑक्टोबर दरम्यान, अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होऊन सोहळा यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन श्री देव राधाकृष्ण मंदिर वैश्य समाजाचे पदाधिकारी सदस्य तसेच बाळगोपाळ मंडळाकडून करण्यात आले आहे.

बुधवार तारीख ४ ऑक्टोबर रोजी सकाळी पूजाअर्चा- घटस्थापना हरिनामाच्या गजरात फटाक्याच्या आतषबाजीत संपन्न होईल. त्यानंतर डोलताशांच्या ५० जणांच्या पथकाकडून शिडवणे भजन मंडळाचे नाविन्यपूर्ण भजन सादर होणार आहे. दुपारी स्व. राणे गुरुजी आणि ज्येष्ठ मंडळींनी सुरू केलेला, हरिपाठ होईल. त्यानंतर परमपूज्य कलावती आईच्या भक्तांकडून प्रवचन आणि भजन, तसेच संध्याकाळी विनोद गोखले यांचे सुश्राव्य कीर्तन सादर होईल. त्यानंतर वारकरी भजन आणि रात्रभर स्थानिक निमंत्रित भजन मंडळांना सेवा करण्याची संधी देण्यात येईल. गुरुवारपासून जीवनविद्या मिशन फोंडाघाट शाखेकडून उपासना यज्ञ आणि नामस्मरण- स्फूर्तीगीते संपन्न होतील. याशिवाय दरवर्षी उदंड उत्साहात पार पडणारी, आर. के. ग्रुप फोंडाघाट आयोजित जिल्ह्यातील नामवंत भजनी मंडळांचा सहभाग असलेली, ‘खुली भजन स्पर्धा’ तारीख ४ ते ६ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी रोख पारितोषिकांसह आकर्षक स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे.

शेवटच्या रात्री हायस्कूल- बालगोपाळ मंडळाची विविध आध्यात्मिक विषयावरील रंगीत संगीत दिंडी, ढोल ताशांच्या हरिभजनाच्या जयघोषात काढण्यात येणार आहे. याशिवाय लहान मुलांसाठी फनी गेम्स, महिलांसाठी हळदीकुंकू आणि नामांकित डबलबारी भजनांचा सामना आयोजित करण्यात आला आहे.

संपूर्ण बाजारपेठेला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. त्यामुळे येणारे सात दिवस बाजारपेठ दिवस रात्र गजबजलेली राहणार आहे. या निमित्ताने बाहेरगावी उद्योग नोकरी निमित्त असलेली चाकरमानी माहेरवाशीणी फोंडाघाटला येतात. गाठीभेटी होतात. स्नेह-जिव्हाळा वाढतो. त्यामुळे अखंड हरिनामाचा वेध सर्वानाच लागलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!