असा साजरा होतोय केळुस कालवीबंदर येथिल खवणेकर कुटुंबाचा गणेशोत्सव

असा साजरा होतोय केळुस कालवीबंदर येथिल खवणेकर कुटुंबाचा गणेशोत्सव

*कोकण Express*

*असा साजरा होतोय केळुस कालवीबंदर येथिल खवणेकर कुटुंबाचा गणेशोत्सव*

*दर वर्षी कधी १७ तर कधी २१ दिवसासाठी असतो गणपती बाप्पा मुक्कामाला*

*तर यंदा श्री गणपती बाप्पाचे खवणेकर कुटुंबांच्या घरी २१ दिवस पूजन करण्यात आले आहे*

*सिंधुदुर्ग:-*

कोकणात गणेश चतुर्थी म्हणजे सर्वात मोठा आणि आनंदाचा सण.या सणात प्रत्येक घरा घरात गणरायाचे पुजन करुन गणेशोत्सव अगदी आनंदाने साजरा केला जात असतो. कोणी दिड कोणी पाच, सात, नऊ, अकरा,सतरा,एकवीस दिवस घरात गणरायाचे पुजन करुन त्याची भक्तीभावाने सेवा करीत हा सण साजरा करत असतात.

वेंगुर्ला तालुक्यातील केळुस कालवीबंदर येथिल खवणेकर कुटुंबिय सुद्धा याला अपवाद नसून या कुटुंबात गणेश चतुर्थी सण अगदी मोठ्या भक्तिभावाने,भक्तीपुर्ण वातावरणात साजरा करीत असतात.

केळुस कालवीबंदर येथिल श्री नारायण खवणेकर हे एक निस्सीम गणेश भक्त असुन ते गणेश चतुर्थीला दरवर्षी कधी १७ दिवस तर कधी २१ दिवसांसाठी आपल्या निवासस्थानी विघ्नहर्ता श्री गणेशाचे पुजन करुन त्याची मनोभावे सेवा करीत असतात.२१ दिवस रोज सकाळी स्वतः कुटुंबातील सदस्यांसमवेत श्री गणेशाची पुजा अर्चा आरती करुन दुपारी श्री गणपतीला नैवेद्य दाखवून रात्री परत आरती भजन करुन आपली कित्येक वर्षांपासूनची गणेश सेवेची परंपरा सुरू ठेवत आहेत.

श्री नारायण उर्फ बापू खवणेकर यांचे सुपुत्र पत्रकार श्री आबा खवणेकर आणि विद्याधर खवणेकर हे सुद्धा आपल्या वडीलांप्रमाणे श्री गणपती गजानन देवावर अढळ श्रद्धा ठेऊन दररोज पुजा अर्चा आरती भजन आदींमध्ये मनोभावे सहभागी होत असतात. या २१ दिवसांत खवणेकर कुटुंबीयांच्या घरी गणेश दर्शनासाठी दररोज शेकडो गणेश भक्त बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावत असतात. येणार्‍या प्रत्येक गणेश भक्तांचे घरातील सर्व मंडळीकडुन अगदी आनंदाने स्वागत आणि आदरातिथ्य केले जात असते. विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती खवणेकर कुटुंबाच्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात.तसेच दररोज गावासह वेगवेगळ्या ठिकाणची भजनी मंडळ आपली भजन सेवा या गणपती समोर सादर करीत असतात.या २१ दिवसांच्या कालावधीत येणारी संकष्टी चतुर्थी म्हणजे सर्व गणेश भक्तांना खवणेकर कुटुंबातील गणपती म्हणजे एक पर्वणीच असते.या दिवशी दर्शनासाठी त्यांच्या घरी खुप गर्दी होत असते. १७ किंवा २१ दिवसांनी श्री खवणेकर कुटुंबियांच्या वतीने अगदी भक्तीमय वातावरणात परंतु साश्रू नयनांनी निरोप दिला जातो. त्यावेळी होणारी श्री गणेश विसर्जन मिरवणूक निमित्ताने होणारी फटाक्यांची आतषबाजी म्हणजे एक विशेष आकर्षण ठरत असते.तर श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीलाही कालवीबंदर वाडीतील भाविक ग्रामस्थ तसेच महिलांही मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!