*कोकण Express*
*सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचा एनजीओ समिटमध्ये गौरव*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
कोकण एनजीओ फेडरेशन ने आयोजित केलेल्या एनजीओ समिट 2023 मध्ये तळेरे (ता. कणकवली) येथील स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टला मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. गेली 25 वर्षे या ट्रस्ट मार्फत तळेरे दशक्रोशीत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याची दखल घेण्यात आली. याबद्दल ट्रस्टचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
यावेळी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे उद्घाटक एम्पायर स्पायसेस अँड फुडस लिमिटेडचे चेअरमन हेमंत राठी यांच्या हस्ते शाल, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कुडाळ येथे नुकत्याच झालेल्या एनजीओ समिट 2023 मध्ये हा गौरव करण्यात आला. यावेळी स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, विश्वस्त बापू महाडिक, नितीन तळेकर, स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत वरुणकर, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर यांनी हा गौरव स्विकारला.
यावेळी दिलेल्या गौरव पत्रात म्हटले आहे की, आपण समाजाप्रती जे निस्वार्थी भावनेने समर्पित भावनेने कार्य सुरू केलेले आहे त्याबद्दल हा गौरव करताना आम्हाला आनंद होत आहे. आपण लोकांचे जीवनमान सुधाण्यासाठी अथक परिश्रम करत आहात. आपल्या कार्यामुळे समाज जीवनावर सकारात्मक प्रभाव पडला आहे. आणि ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या ट्रस्टचे कार्य तळेरे दशक्रोशित गेली 25 वर्षे क्रीडा, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अविरतपणे सुरू आहे.