*कोकण Express*
*शिवसेना जिल्हाप्रमुखपदी संदेश पारकर, संजय पडते…!*
*कणकवली विधानसभा प्रमुखपदी सतीश सावंत…!*
*संपर्कप्रुमखपदी अतुल रावराणे…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्हयातील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या जाहिर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जिल्हाप्रमुखपदी संदेश पारकर व संजय पडते तर कणकवली विधानसभा प्रमुखपदी सतीश सावंत व कणकवली विधानसभा संपर्कप्रमुखपदी अतुल रावराणे यांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेना ठाकरे गटातील सिंधुदुर्गातील प्रमुख पदाधिकार्यांच्या नियुक्त्या गेले काही महिने रखडल्या होत्या. अखेर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून नवीन पदाधिकार्यांची नावे जाहिर करण्यात आली आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्गात दोन जिल्हाप्रमुख देण्यात आले असून संदेश पारकर यांच्याकडे कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण या चार तालुक्यांची तर संजय पडते यांच्याकडे सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग व कुडाळ तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कणकवली, देवगड, व वैभववाडी तालुक्याचा समावेश असलेल्या कणकवली विधानसभा मतदार संघाच्या प्रमुखपदी सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी अतुल रावराणे यांच्याकडे देण्यात आली आहे. पक्षनेतृत्वाने पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करताना जिल्हयातील प्रमुख पदाधिकार्यांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबईत मातोश्रीवर झालेल्या बैठकीत या पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. तत्पुर्वी झालेल्या चर्चेमध्ये तुम्ही कणकवलीतून शिवसेनेचा एक आमदार निवडून द्या. मी तुम्हाला दुसरा आमदार देतो असा शब्द नेतृत्वाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे एक प्रकारची ऑफर देताना शिवसेना नेतृत्वाने कणकवली विधानसभेचा पक्षाचा आमदार निवडून आणण्यासाठी आता कामाला लागा अशा सूचना पदाधिकारी व शिवसैनिकांना केल्या आहेत. त्यामुळे येत्या निवडणूकीत पक्षाने दिलेला उमेदवाराला निवडून आणल्यास शिवसेना नेतृत्वाकडून विधानपरिषदेवर कणकवली मतदारसंघातील आणखी एका पदाधिकार्याला आमदारकीची संधी मिळणार आहे.