*कोकण Express*
*कणकवलीत लवकरच कला अकादमी उभारणार…!*
*माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती…!*
*कणकवलीत ‘ऊरी पाऊस दाटला’चे लॉचिंग…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सांस्कृतिक क्षेत्रात कणकवलीतील अनेक कलाकारांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. ही बाब तुम्हा आमच्यासाठी
अभिमानास्पद आहे. शहराला सांस्कृतिक वारसा लाभला असून हा वारसा जपण्यासाठी लवकरच एसटीच्या बसस्थानक नजीक असलेल्या जागेत कला अकादमी उभारली जाणार आहे. तसेच सिंधुदुर्गातील संगीतप्रेमींनी एकत्र येऊन ऊरी पाऊस दाटला’ हा अल्बम तयार करण्याचे केलेले धाडस निश्चितपणे कौतुकास्पद असून हे संगीतप्रेमी भविष्यात नवीन अल्बम काढणार असतील तर त्यांना लागणारे सर्वतोपरी सहकार्य करेन, अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
सिंधुदुर्गातील संगीतप्रेमींनी एकत्र येऊन ऊरी पाऊस दाटला’ हा अल्बम तयार केला आहे. त्याचे लॉचिंग येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात अणाव येथील आनंदाश्रमाचे संस्थापक बबन परब व त्यांच्या पत्नी सविता परब यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्री. नलावडे बोलत होते. यावेळी साहित्यिक विलास खानोलकर, अभिनेते नीलेश पवार, अभिषेक पवार उपस्थित होते.
बबन परब म्हणाले, १२ वर्षापूर्वी मी निराधार वृद्धांसाठी आनंदाश्रम काढण्याचे ठरवले होते. त्यावेळी मला कणकवलीकरांनी मदतीचा हात दिला होता. तो मदतीचा हात आजही कायम आहे. निराधार वृद्धांना आनंदाश्रमात आधार देऊन त्यांच्या निवासाची, जेवणाची, आरोग्याची सोय आम्ही विनामूल्य करीत आहोत. आनंदाश्रम सुरु झाल्यापासून आजपर्यंत सिंधुदुर्गातील अनेक दानशूर व्यक्तींनी आम्हाला मदत केलेली असून त्यांच्या विश्वासावर आम्ही नि:स्वार्थीपणे वृद्धांची सेवा करीत आहोत. जिल्ह्यातील संगीतप्रेमींनी एक येऊन तयार केलेला ऊरी पाऊस दाटला’ या अल्बममधील गाणी रसिकांना हृदयात घर करू राहतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
गाण्यांचा अल्बम करणे ही सोपी गोष्ट नाही, असे असतानाही जिल्ह्यातील संगीतप्रेमींनी एकत्र येऊन ‘ऊरी पाऊस दाटला’ हा अल्बम तयार करून शिवधनुष्य पेलेले असून हा अल्बम लवकरच फेमस होईल, असा विश्वास विलास खानोलकर यांनी व्यक्त केला. अभिषेक पवार यांनी हा अब्लम तयार केल्याबद्दल नीलेश पवार व त्यांच्या टीमचे कौतूक केले.