*कोकण Express*
*कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मध्ये संजय आग्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मध्ये संचालक श्री संजय आग्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
सामाजिक जाण असलेल्या व्यक्तीला शुभेच्छा देताना डॉ. सतीश कामत म्हणाले की आग्रे साहेब हे समाजात जाऊन काम करणारे व्यक्तिमत्व आहे. नेहमी हसतमुख असणारी व्यक्ती आज लोकप्रियतेच्या शिखरावर उभी आहे. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे संचालक ते जिल्हा परिषद सदस्य व त्यानंतर एका महत्त्वाच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष हे त्यांच्या कर्तुत्वाचा एक भाग आहे. आपल्यातला माणूस एक उत्तम भरारी घेतो यात आम्हाला आनंद आहे. असे प्रतिपादन केले.
त्यावेळी बोलताना श्री. संदेश पटेल म्हणाले की संजय आग्रे हे आपल्यातले व्यक्तिमत्त्व आहे. आपल्यातला माणूस आमदार झाला तर तो आपल्या समस्या जाणून घेईल. व भविष्यात रोजगाराची संधी फोंडाघाटमध्ये सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. पूर्वीच्या काळात जिल्ह्याचे राजकारण फोंड्यातून चालत असे. आता या सध्याच्या काळातही तीच चाहूल संजय आग्रे यांच्या माध्यमातून दिसू लागली आहे. त्यामुळे आपल्या हक्काच्या माणसाला आपली तरुणाईची साथ मिळाली तर नक्कीच आपली ताकद वाढेल आणि आपली प्रगती होईल. अशा शब्दात संजय आग्रे यांना शुभेच्छा दिल्या.
आपल्या वाढदिवसाच्या सत्काराचे उत्तर देताना श्री. संजय म्हणाले की मी शालेय जीवनात फार गंभीर नव्हतो. त्यावेळी शिक्षकानी शिक्षणाचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी समजत नव्हते आणि समजले तेव्हा वेळ गेली होती. तुम्ही असे करू नका. शिक्षणाचे संस्कार चांगल्या रूपाने करून घ्या. चांगल्या संस्कारची नोंद समाज नेहमी घेतो. त्यानंतर मी खूप कष्ट केले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातला मी आहे परंतु माझ्यावरील चांगल्या संस्काराने आज फोंड्याच्या प्रत्येक निर्णयात मी असतो. तो एका चांगला तोडगा निघण्यासाठी. ही माझी प्रगती माझे आई वडील आणि शिक्षकांमुळे आहे. आपण अशीच प्रगती करावी आणि भविष्यात तुमच्यातून एखादा संजय निर्माण व्हावा अशी आशा बाळगतो. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला सेक्रेटरी चंद्रशेखर लिग्रस खजिनदार आनंद मर्ये, संदेश पटेल, बबन पवार, राजू पटेल हे संचालक तर तालुकाप्रमुख भूषण परुळेकर व युवा सेना जिल्हा अध्यक्ष हे उपस्थित होते. महाविद्यालयाच्या सर्व कर्मचारी वर्गने व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने शुभेच्छा दिल्या.