*कोकण Express*
*मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ला सरकारपूरस्कृत, या सरकारला जनता माफ करणार नाही*
*आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी व्यक्त केला तीव्र निषेध*
*सिंधुदुर्ग*
जालना येथे संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवांवर मराठा विरोधी महायुती सरकार आणि भाजपा गृहमंत्र्यांचा आदेशानुसार पोलिसांनी अत्यंत अमानुषपणे लाठीहल्ला केला. या हल्ल्यात अनेक महिला, वृद्ध जखमी झाले. पुरोगामी महाराष्ट्रात सत्तेची धुंदी इथली जनता अजिबात सहन करणार नाही असे सांगत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी या कृत्याचा जाहीर निषेध केला आहे.
यावेळी विवेक ताम्हणकर म्हणाले की, बपोलिसांनी महिला, वयोवृध्द नागरिक, लहान मुलांना व उपचार करणाऱ्या डॉक्टरला सुद्धा मारहाण केली, मोठ्या प्रमाणात छऱ्यांचा वापर करण्यात आला. आम आदमी पार्टी या घटनेचा जाहीर निषेध करत असून या घटनेची जबाबदारी स्वीकारून निर्दोष मराठा समाजावर अमानुष लाठीचार्ज करण्याचे आदेश देणारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान या घटनेची सखोल चौकशी करून अत्याचार करणाऱ्या दोषी पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या अमानुष लाठीचार्ज मध्ये जखमी झालेल्या मराठा बांधवांना शासनातर्फे भरपाई व आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.