*कोकण Express*
*पाडलोस येथे पत्रकार विश्वनाथ नाईक यांचा सत्कार*
*बांदा ः प्रतिनिधी*
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या म्हणा किंवा अन्य समस्या समजून घेऊन ते प्रत्यक्षात मांडणे खूप कठीण असते आणि त्या समस्यांना न्याय देण्याचे काम खऱ्या अर्थाने पत्रकार करतो. त्यामुळे समाजाने कठीण परिस्थितीत खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील पत्रकारांना पाठबळ देण्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभे राहावे, असे प्रतिपादन पाडलोस येथील राजू शेटकर यांनी केले. पाडलोस श्री देव रवळनाथ मंदिरात पत्रकार विश्वनाथ नाईक यांना सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचा उत्कृष्ट ग्रामीण पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचा गाव ग्रुपतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी पाडलोस गावातील संतोष आंबेकर, महेश गावडे, सदस्य प्रकाश करमळकर, दादा सातार्डेकर, प्रथमेश सातार्डेकर, संजय पाडलोसकर, महेश गावडे, उमेश सातार्डेकर, बंटी गावडे, सचिन पाडलोसकर, प्रज्योत माधव, शिवराम पाडलोसकर, सुनिल पाडलोसकर, महेश पाडलोसकर, मनोज गावडे, रवींद्र सातार्डेकर आदी उपस्थित होते. शहरातील पत्रकारिते पेक्षा ग्रामीण भागातील पत्रकारिता करताना अनेक अडचणींचा सामना पत्रकारांना करावा लागतो. शहरात एकाच भागात सर्व बातम्या मिळतात, परंतु ग्रामीण भागात दहा बारा किलोमीटर अंतरावर पत्रकारांना जावे लागते. काही वेळा एकाच वेळी दोन तीन घटना घडल्यास वृत्तसंकलन करणे कठीण होते. मडुरा व आरोस पंचक्रोशीतील काही गावांमध्ये एखादवेळी वृत्तसंकलन करण्यासाठी पायी चालत जावे लागते तरीही कोणतीही पर्वा न करता पत्रकार तिथपर्यंत पोहचतात. त्यामुळे केवळ पत्रकारांमुळेच आम्हाला ग्रामीण भागातील वृत्त वाचनास मिळते. पाडलोस गावचे सुपुत्र विश्वनाथ नाईक यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे आमच्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे पाडलोस ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, सत्काराला उत्तर देताना विश्वनाथ नाईक म्हणाले की, ग्रामस्थांनी केलेला सत्कार म्हणजे माझ्या कार्याची पोचपावती आहे. पाडलोससह मडुरा व आरोस पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच मला हा मान मिळाल्याचे सांगत श्री. नाईक यांनी सर्वांचे आभार मानले.