*कोकण Express*
*रॅगिंग ही एक सामाजिक कीड ; प्रा. विनोद पाटील*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय मध्ये अँटी रॅगिंग सेलचा उद्बोधन वर्ग संपन्न झाला. या सेलचे समन्वयक प्रा. विनोद पाटील आपल्या उद्बोधनपर भाषणात म्हणाले की, रॅगिंग ही एक सामाजिक कीड आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद होते. विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या आयुष्यात खूप मेहनत घेत असतो. ती मेहनत घेत असताना जर कोणी स्वतःच्या विकृत हौसेपोटी दुसऱ्याला त्रास देत असेल आणि त्यातून त्याचे आयुष्य बरबाद होत असेल तर ते चुकीचे आहे. यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने त्याची गांभीर्याने दखल घेतली असून रॅगिंग विरुद्धचे कायदे कडक केले आहेत. त्यामुळे रॅगिंग करणाऱ्याला कडक शिक्षा होते. खरं म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नसतो. रॅगिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी महाविद्यालयात आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय व यूजीसी यांच्या आदेशानुसार सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये अँटी रॅगिंग सेल स्थापन करणे बंधनकारक केले आहे. महाविद्यालयात प्रवेश घेताना सर्व विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन प्रतिज्ञापत्र करून घेतले जाते. कोणत्याही विद्यार्थ्यांने अथवा त्यांच्या गटाने इतर विद्यार्थ्यांना शारीरिक, शाब्दिक, मानसिक, लैंगिक त्रास दिल्यास ती घटना रॅगिंग म्हणून नोंद होते व त्याविरुद्ध फौजदारी गुन्हाही दाखल होतो. अशा गुन्हेगारास भारतीय दंडविधानानुसार शिक्षेची तरतूद केली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सतीश कामत म्हणाले की, महाविद्यालयाचे वातावरण आनंदी व निकोप राहणे आवश्यक आहे. प्रत्येकाला आपले करिअर घडवण्याचा अधिकार आहे. परंतु रॅगिंग सारखी विकृती दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळत असते. अशा विकृती पासून दूर राहून आपल्या महाविद्यालयाचा परिसर आनंदी उत्साही करावा. रॅगिंगचा बळी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांनी लज्जित न होता धाडसाने महाविद्यालयातील अँटी रॅगिंग समितीशी तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन केले.
उद्बोधन वर्गात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.