*कोकण Express*
*प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी व समुपदेशन शिबीराचे उदघाटन संपन्न*
*मुंबई*
२३.०८.२०१३ रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी व समुपदेशन शिबीराचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) चे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. भरत कळसकर यांनी प्रास्ताविक केले.
रस्ता सुरक्षा उपक्रमाअंतर्गत नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी व समुपदेशन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर पहिल्या टप्यात दिनांक २३ व २४ ऑगस्ट या तारखांना सुमारे २०० वाहन चालकांना घेवून राबविण्यात आले. एकूण ५०० वाहन चालकांपर्यंत या शिबीराच्या माध्यमातून पोहचण्याचा या कार्यालयाचा मानस आहे. या कार्यक्रमाचा उद्देश महाराष्ट्रात रस्त्यावर होणान्या अपघातांचे प्रमाण कमी करणे व सुरक्षित वाहन चालकाद्वारे प्रवास सुकर व सुलभ होणे हा आहे. या शिबीरात प्रामुख्याने दिवस-रात्र वाहन चालविणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या वाहनचालकांना पहिल्या टप्यात लक्ष्य करण्यात आले आहे. या वाहन चालकांना अवेळी जेवण, अपुरी झोप व व्यसनाधीनता यामुळे विविध आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते व नेत्र विकारही आढळून येतात. तेव्हा अशा चालकांची आरोग्य तपासणी करून त्यांना रेफरल सर्विससाठी उद्युक्त करणे व मोफत चष्म्यांचे वाटप करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख हेतू आहे.
या कार्यक्रमास अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी प्रात्यक्षिके व पी.पी.टी. द्वारे समुपदेशनासाठी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने वाहनांना आग लागणे, अपघात होणे व इतर अनुषंगिक उद्भवणा-या समस्यांना कसे तोंड द्यावे याबाबत प्रात्यक्षिक व चलचित्राद्वारे वाहन चालकांना प्रशिक्षण देण्यात आले. श्री. विनायक जोशी डिफेन्सीव्ह ड्रायव्हिंग व रस्त्यावर वाहतूक नियमांचे पालन कसे करावे याबाबत समुपदेशन केले. तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सर्व वाहन चालकांना शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमास श्री. भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) व या कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी श्री. रोहन मोरे व कर्मचारी, बस संघटनेचे श्री. रमेश मणियन व डॉ. जिग्नेश उपाध्याय उपस्थित होते.