*कोकण Express*
*कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी राज्यातील खासदारांनी पाठपुरावा करावा* -मोहन केळुसकर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोकण रेल्वे मार्ग हा भारताच्या कानाकोपऱ्याला जवळच्या अंतराने जोडणारा मार्ग आहे. भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त संख्येने प्रवासी गाड्यांसह मालवाहू गाड्या धावत आहेत. काही राज्यांतील प्रवाशी या मार्गावरुन आपल्या भागातूनही प्रवासी गाड्या सोडाव्यात अशी मागणी करीत आहेत. त्यामुळे या मार्गाचे दुपदरीकरण जलद गतीने सुरू व्हायला हवे. त्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे, असे आवाहन कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
सततच्या प्रयत्नांमुळे कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम द्दष्टीपटावर आले आहे. त्याचप्रमाणे कराड – चिपळूण रेल्वे मार्गाचे मार्गी लागले पाहिजे. भविष्यात या दोन्ही मार्गांचे काम मार्गस्थ लागल्यावर कोकण रेल्वे मार्गावर प्रवासी आणि मालवाहतूक गाड्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढेल, असे स्पष्ट करून केळुसकर म्हणाले, आजच्या घडीला कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या गाड्या नेहमीच विलंबाने धावताना दिसत आहेत. कोकणातील गणेशोत्सव काळात तर मोठ्या प्रमाणात जादा गाड्या सोडल्या जातात. एकच मार्ग असल्याने कोकम रेल्वे प्रशासनाला नेहमीच तारेवरची कसरत करावी लागत असते. शिवाय हा मार्ग युद्धजन्य परिस्थिती ओढावली तर सैन्यांची जलद गतीने वाहतूक करण्याच्यादृष्टीने कमी अंतराचा मार्ग आहे. या सर्वं बाबींचा विचार करून कोकणासह राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी कोकण रेल्वेचे दुपदरीकरण करण्यासाठी केंदात संघटितपणे आवाज उठविला पाहिजे.