*कोकण Express*
*आमदार नितेश राणे यांच्या आश्वासनाअंती बबली राणे यांचे उपोषण मागे*
*सीएसआर निधीतून ओसरगाव तलावाचा पर्यटन विकास करण्याचे नितेश राणे यांचे आश्वासन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील महामार्गालगत असलेल्या ओसरगाव तलावाचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा व तालुक्यातील एक महत्त्वाचे हे पर्यटन स्थळ बनवावे या करिता ओसरगावचे माजी उपसरपंच बबली राणे ,ग्रामस्थ सुदर्शन नाईक यांनी १५ जानेवारी रोजी मध्यरात्रीपासून सुरू केलेले आमरण उपोषण अखेर आमदार नितेश राणे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. ओसरगाव तलावाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी राज्य सरकारकडे निधी नाही. अशा स्थितीत राज्य सरकार या तलावाचा पर्यटन दृष्ट्या विकास करू शकत नाही. राज्य सरकार जवळ कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळे राज्यातल्या एखाद्या मोठ्या कंपनी’ च्या सीएसआर निधी आणत ओसरगाव तलावा या पर्यटन दृष्ट्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या खासदार निधीमधून तलावाच्या बंधाऱ्याच्या खालील बाजूला असलेला रस्ता करण्यासाठी दहा लाखाचा निधी प्रस्तावित आहे. कोविड मुळे या कामांची कागदोपत्री प्रक्रिया रखडली आहे. तसेच जलसंपदा विभागामार्फत ही गाळ काढणे व लिकेज काढणे हे काम प्रस्तावित आहे. तलावाच्या पर्यटन विकासाची जबाबदारी मी उचलत असून पर्यटन विकासासाठी ओसरगाव तलावाला सीएसआर निधी आणून मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले. आमदार नितेश राणे यांची पर्यटनदृष्ट्या असलेली दूरदृष्टी व विविध उपक्रमांच्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यात राबविलेले उपक्रम हे प्रत्यक्षात अंमलात आणले आहेत. त्यामुळे त्यांनी व कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या ठोस आश्वासन अंती मी उपोषण मागे घेत असल्याचे बबली राणे यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, लघु पाटबंधारे विभागाचे रत्नागिरी येथील कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, उपविभागीय अधिकारी पी आर पाटील, कनिष्ठ अभियंता बी एच तरटे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व्ही पि लिंग्रज यांच्यासह ओसरगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नितेश राणे यांच्या भेटीपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अबिद नाईक व कणकवली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनीही बबली राणे यांची भेट घेत चर्चा केली. बबली राणे यांच्या मागणीबाबत राष्ट्रवादीचे नेते जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सोबत चर्चा करत त्यांचे लक्ष वेधले. त्यानुसार श्री राणे यांच्या मागणीनुसार परिपूर्ण प्रस्ताव करा व शासनाकडे पाठवा त्याचा आपण पाठपुरावा करू असे आश्वासन अबिद नाईक यांनी दिले. गेले दोन दिवस या उपोषणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विविध स्तरातील राजकीय-सामाजिक एक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देत पाठिंबा दिल्याबद्दल जिल्हा वासियांचे बबली राणे यांनी आभार मानले.