*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात रंगली कवी लेखकांची मैफिल*
*नामवंत साहित्यिकांच्या उपस्थितीमुळे राज्यस्तरीय चर्चासत्र झाले यशस्वी*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये *साहित्यातील फोंडाघाट* या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चासत्राचे आयोजन महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी. व वाड्.मय मंडळातर्फे करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन ज्येष्ठ लेखक श्री.महेश केळूसकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्यासोबत कवी श्री.शशिकांत तिरोडकर, कवी आणि ललित लेखक श्री. दिलीप सावंत, कादंबरीकार श्री. संतोष तेंडुलकर, नाट्यलेखन व कलावंत श्री. विठ्ठल सावंत हे फोंडाघाट मधील प्रतिथयश प्राप्त साहित्यिक उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यानंतर सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी सोसायटीचे चेअरमन मा. श्री. सुभाष सावंत यांनी बोलताना जेष्ठ कवी कै. वसंतआपटे, कै.वसंत सावंत यांच्या साहित्यिक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. सेक्रेटरी श्री.चंद्रशेखर लिंग्रस यांनी उगवाई नदीच्या पूर्व पुण्याचे, आशीर्वादचे वर्णन करून फोंडाघाट साहित्य भूमी पावन झाली , असे वर्णन केले. संचालक श्री. राजू पटेल म्हणाले की आपल्या कर्तृत्वातून फोंडाघाट भूमी साहित्यिक म्हणून नावा रूपाला आली. ती नावारूपाला येण्यासाठी मान्यवरांची खूप मेहनत आहे. यांचे कर्तृत्व तुम्हाला कळेलच. असे मत व्यक्त केले. त्यानंतर सर्व साहित्यिकांचा फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्यावतीने शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
चर्चासत्राच्या प्रारंभिक वक्तव्यात डॉ महेश केळुसकर यांनी फोंडाघाटची भूमी व गुरुवर्य कै वसंत सावंत यांच्या स्मृतीना उजाळा देऊन महाराष्ट्राच्या नकाशावर फोंडाघाटचे नाव साहित्यिक म्हणून कसे आले याचा आढावा घेतला. महत्त्वाच्या पुस्तकांचे वाचन हे समर्थ माणूस म्हणून उभे राहण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास देईल म्हणून आपण आपलं वाचन वाढवा. असे प्रतिपादन करून नाट्यकर्मी म्हणून या फोंडाघाटला फार मोठा इतिहास असल्याचे सांगितले. साहित्य संस्थेच्या निमित्ताने साहित्यिक चळवळ कशी उभी राहिली हे सांगितले. एक सक्षम, संस्कारी पिढी निर्माण व्हावी. यासाठी फार कष्ट घेतले. एकंदरीतच फोंडाघाट ही कलावंतांची अष्टपैलू भूमी आहे हे त्यांनी विविध आठवणींच्या माध्यमातून सांगितले.
त्यानंतर ज्येष्ठ कवी शशिकांत तिरोडकर यांनी आपल्या ‘मधाचा गाव’ या ललित लेखाचे अधिवाचन केले. त्यात फोंडाघाटचे वर्णन करताना मधाचा स्पेशल गोडवा कसा आहे? तोच गोडवा या मातीत आणि मातीतल्या माणसात कसा उतरला? गावातील दोन नदीनी गावाला वेढले आहे. निसर्गाच्या देणगीची उधळण तर घाटाने केली आहे. असे वर्णन केले. त्याचबरोबर परिसरही कसा समृद्ध आहे याचे विचार मंथन केले.
त्यानंतर श्री.दिलीप सावंत यांनी ‘मुडी’ या ललित लेख संग्रहातील *फकांड* या कथेचे अभिवाचन केले. मालवणी भाषेचा सहज आणि चपलख वापर दिसून येतो. बोली भाषेचा गोडवा आणि एखाद्या शब्दाने अनेक अर्थाची व्याप्ती सांभाळणारी ही बोली. त्यातला फकांडा हा एक शब्द. अतिरेकीपने रंगून सांगितलेली गोष्ट म्हणजे *फकांड*. गोष्टीत बराचसा भाग खोटा असतो. परंतु आपल्या भाषेच्या गोडव्यामुळे आणि मालवणी माणसाच्या अंगी असणाऱ्या मिश्किलपणामुळे कथा भाग संपेपर्यंत सर्व खरं वाटतं. बऱ्याच काळानंतर श्रोत्याला आपण खोट्या गोष्टी ऐकल्यात हे कळतं. आपल्या यशाची गमक सांगताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या.
श्री.संतोष तेंडुलकर यांनी आपल्या ‘निभार’ या कादंबरीतील बैलाला उजू करण्याच्या प्रसंगाचे अभिवाचन केले. वाघ्या हे बैलाचे नाव . डौलदार चालीमुळे आजूबाजूला त्याची दहशत असायची. आईला सोडून तो कोणालाही वर्मायचा नाही. त्याला कामासाठी तयार करायचा होता. या प्रकारालाच बैल उजू करणे असे म्हणतात. खरं म्हणजे हे एक कौशल्य आहे. माणसाचा धाक, प्रेम हे बैलाच्या बैलपणात उतरवणे हे फार मोठे कौशल्य असते. त्यात छोट्या मुलांची येथे लुडबुड छान रेखाटली आहे. कोणत्याही बैलाला उजू करण्याची जबाबदारी तशी अवघ्या वाडीची असते. तर कोकणातील शेतीच्या कामातील एक सहकारी प्रवृत्ती या प्रकारात दिसते. शेतीच्या कामातील स्त्रीचा सहभाग किती असतो? याचेही वर्णन केले आहे.
श्री. विठ्ठल सावंत यांनी अनेक टीव्ही मालिकांचे पटकथांचे लेखन केले आहे. त्यांनी ‘तळीचे टेम’ या लेखाचे अभिवाचन केले. कवळकाडीत वेढलेली ही तळी, पायवाट, टेकडी यांचे त्यांनी बहारदार वाचन केले. उंचावरील पाण्याचा पानवठा म्हणजे तळीचे टेम. पाणी जमिनीपासून उंचावर असले तरी बारमाही असते. नैसर्गिक हालचालीवरच दिनक्रम चालू असायचा. कुकारा देऊन आपल्या उपस्थितीची नोंद करायची हा शेतकरी जीवनाचा प्राण असायचा. कस्टमय शेतकरी जीवनाचे वर्णन त्यांनी केले. परंतु पूर्व आठवणीने त्यांच्या स्मृती जाग्या झाल्या.
आपल्या मिश्किल भाषेत बोलताना डॉ. महेश केळुसकर यांनी रे. टिळकांची कविता शिकवत असताना घडलेल्या प्रसंगाचे वर्णन शब्दबद्ध केले. शिक्षकांच्या शिकवण्याच्या शैलीमुळे कविता कशी हृदयात उतरवते हे सांगितले. साहित्यिक कसा घडतो याची जडणघडण होण्यात आपल्या मातृभूमीचा सहभाग कसा असतो हे सांगितले. प्रत्येक माणसाने आपापल्या क्षमता ओळखून त्या क्षमता पुढे आल्या पाहिजेत. त्या दबून राहता कामा नयेत.
त्यानंतर ‘पावसाचे गजाली’ या कथेचे अभिवचन केले. फोंडाघाट मधील पावसाचे वर्णन केले. घाटमाथ्यावर दरडी कोसळून घाट दिवसेंदिवस बंद असायचा म्हणून पावसाळ्यात पोटात गोळा घ्यायचा. असे वर्णन केले.
चर्चासत्राचे सुत्रसंचालन डॉ. महेश केळुसकर यांनी खुमासदार व मिश्किल भाषेत केले. या कार्यक्रमाला नेरुरकर, नंदू कोरगावकर, अण्णा तेंडुलकर, मिलिंद पारकर, दिलीप पारकर, सुनिता नाडकर्णी दप्तरदार, अभिषेक साटम, माजी खजिनदार अजित नाडकर्णी यांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेअरमन श्री. सुभाष सावंत, सेक्रेटरी श्री.चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार श्री. आनंद मर्ये महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रंजन चिके व संचालक राजू पटेल तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. सतीश कामत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विनोद पाटील यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयीन सर्व कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.