*कोकण Express*
*बेवारस स्थितीत आढळलेल्या महिलेला सखी सेंटरमध्ये दाखल केल्याने वृद्धेला निवारा*
*मालवण प्रतिनिधी*
आचरा पिरावाडी येथील चव्हाट्यावर बेवारस स्थितीत आढळलेल्या महिलेला आचरा पोलीसांनी आधार देत ओरोस येथील सखी सेंटरमध्ये दाखल केल्याने वृद्धेला निवारा मिळाला आहे.
गुरुवारी सायंकाळी आचरा पिरावाडी येथील चव्हाट्यानजिक मुकी,बहिरी अशी वृद्धा बेवारस स्थितीत असल्याची खबर पिरावाडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी आचरा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलीस स्टेशनच्या पोलीस उप निरीक्षक वृषाली पाटील, जमादार सौ मिनाक्षी देसाई यांनी पिरावाडी येथे जात वृद्धेला मायेने पोलीस स्टेशनला आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र खाकी वर्दी बघून घाबरलेली वृद्ध महिला लांब पळू लागली. यामुळे पोलीस कर्मचारयांनी स्थानिक महिलांच्या सहकार्याने तीला जेवण देत रात्री सिव्हिल ड्रेस मध्ये जावून तीला ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनला आणून तीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र मुकी बहिरी असल्याने तीच्या कडून प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून तीला आचरा पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस जमादार सौ देसाई, पोलीस नाईक सौ ज्योती परब हवालदार मनोज पुजारे, आदींच्या सहकार्याने गाडीने ओरोस येथील सखी सेंटरमध्ये रात्री उशिरा दाखल करण्यात आले.
सदर वृद्ध महिले बाबत कुणाला काही माहिती असल्यास आचरा पोलीस स्टेशन किंवा सखी केंद्र ओरोस येथे संपर्क साधण्याचे आवाहन आचरा पोलीसांनी केले आहे