*कोकण Express*
*मसुरे डांगमोडे येथील प्राथमिक विद्यामंदिरला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शतक महोत्सव समिती तर्फे संगणक आणि प्रिंटर प्रदान*
*मालवण ः प्रतिनिधी*
आजचे युग हे स्पर्धेचे युग असून इंटरनेट आणि संगणकामुळे जग एका बोटाच्या क्लिकवर आले आहे अशावेळी आमच्या मुलांना संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी शतक महोत्सव समितीने जो संगणक आणि प्रिंटर दिला आहे त्याचा योग्य वापर मुलांनी करून प्रगती साधावी असे आवाहन प्राथमीक विद्यामंदिर शतक महोत्सव समिती डांगमोडेचे सल्लागार श्री सुरेंद्रनाथ ठाकूर यांनी येथे बोलताना केले
मालवण तालुक्यातील मसुरे डांगमोडे येथील प्राथमिक विद्यामंदिर मध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शतक महोत्सव समिती तर्फे प्राथमिक विद्यामंदिर ही शाळा संगनिकृत करण्यात आली या शाळेला देण्यात आलेल्या संगणक व प्रिंटर चे उदघाटन सुरेंद्रनाथ ठाकूर व माजी प. स. सदस्या सौ. गायत्री ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच सौ. गायत्री ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
भारताचा स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमानी उत्साहात साजरा झाला. यावेळी मुख्याध्यापक श्री. डोंगळे यांनीही शाळा, स्वच्छता, व्यसनाचे दुष्परिणाम, गावचा विकास याविषयीं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर ज्येष्ठ नागरिक प्रकाश ठाकूर यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व पटवून देताना स्वातंत्र्यवीराच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे व योगदान देण्याविषयीचे महत्व स्पष्ट केले
विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी यावेळी मुख्याध्यापक श्री. डोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी २३ योगासने सादर केली. सूत्रसंचालन मुख्यध्यापक श्री. डोंगळे यांनी केले. तर आभार शशांक ठाकूर यांनी मानले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर ठाकूर, उपाध्यक्ष महेश ठाकूर यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. तर शतक महोत्सव समिती अध्यक्ष नारायण ठाकूर, बाळप्रकाश ठाकूर यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.