*कोकण Express*
*राज्यातील मंत्र्याचा हात असल्यानेच नोटिस बजावली…*
*नोटिसांसारख्या धमक्यांना घाबरणारा मी नाही*
*भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भाजी मार्केट इमारतीचे बांधकाम थांबविण्याबाबत नगरपंचायत मुख्याधिकार्यांनी मला नोटीस बजावली आहे. पण नोटिसांसारख्या धमक्यांना घाबरणारा मी नाही. मला नोटिस बजावण्यामागे राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांचा हात आहे. त्याशिवाय मुख्याधिकारी मला नोटीस काढू शकत नाहीत असे प्रत्युत्तर भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिले.
येथील भाजप कार्यालयात श्री.तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी नगरपंचायतीने ग्लोबल असोसिएटला बजावलेल्या नोटिसीबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, १७ हजार चौरस फुटाची आणि साडे पाच कोटी रूपये किंमतीचे भाजी मार्केट नगरपंचायतीला मोफत बांधून देण्याचा पहिलाच उपक्रम कणकवलीत होत आहे. त्याचे नगरपंचायत सत्ताधारी-विरोधकांना वावडे का? हे मला समजलेले नाही. भाजी मार्केटला विरोध करण्यासाठी नगरपंचायतमध्ये सत्ताधारी विरोधक एकत्र आले. किंबहुना सत्ताधारी-विरोधक एकत्र येण्यासाठी मी निमित्त ठरलो ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे
तेली म्हणाले, शहरवासीयांना भाजी मार्केट हवे आहे. पण नगरपंचायतीला जर मोफत बांधून मिळणारे भाजी मार्केट नको असेल तर सत्ताधार्यांचे काय करायचे याचा विचार जनताच केल्याशिवाय राहणार नाही. नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी या इमारतीच्या बाबतीत माझ्यावर एवढे प्रेम केले ते प्रेम त्यांनी असेच ठेवावे असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.