*कोकण Express*
*पेडांवरील अळंबी @ दर रुपये १२००+*
*बकर्याच्या मटणापेक्षा दीडपटहून अधिक दर
कोकण विद्यापिठाने संशोधन करावे -भाई चव्हाण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोकणातील अस्सल खव्वये वाट पहात असलेली मुंगीच्या वारुळांवरील अर्थात पेडांवरील नैसर्गिक अळंबी सिंधुदुर्गसह कोकणातील बाजारपेठांमध्ये दाखल होत आहे. मात्र या अळंबीचे दर सामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. बाजारात पानावर लावण्यात येणार्या अळंबीचे वाट्यांचा दर २०० रुपये एवढा आहे. त्याचे वजन जेमतेम १५० ग्रॅमचे असते. किलोच्या हिशोबात या अळंबीचा दर १२०० रुपये किलोवर वर जातो. तरी अस्सल खवय्ये वर्षातून ठराविक कालावधीत मिळणारी ही खास मांसाहाराच्या चवीची अळंबी खरेदी करताना बाजारात दिसत आहेत. कोकण कृषी विद्यापीठाने कारटोलीप्रमाणे या नैसर्गिकरित्या उगविणार्या रान अळंबीवर संशोधन करुन बारमाही वाण विकसित करावा, अशी मागणी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण प्रदेशाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.
भाताच्या गवतावर बारा महिनेही उत्पादन येणार्या अळंबीचा दर २०० रुपये किलोच्या दरम्यान असतो. म्हणूनच कोकण कृषी विद्यापीठाने या नैसर्गिक अळंबीवर संशोधन करुन कारटोली प्रमाणे या अळंबीचा एकाद्या वाण वारुळासारख्या मातीच्या माध्यमातून शेतकर्यांसाठी बारमाही कालावधीसाठी विकसित करावा. त्यामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नात भर पडेल. तसेच पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या या अळंबीचे दर सामान्यांच्या आवाक्यात येईल, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
बाजारात बकर्याचे मटणाचा किलोचा दर ७२० रुपये असा आहे. पापलेट, सुरमई, रावस आदीं माशांचे किलोचे दर साधारण रुपये ६०० च्या दरम्यान आहेत. त्यामानाने या नैसर्गिक अळंबीचे दर खवय्यांसाठी अवाच्या सव्वा आहेत, असे खवय्याचे मत आहे , अशी माहिती देऊन चव्हाण म्हणाले, सद्या बाजारात मालवणी भाषेतील फागला (कारटोली) ही फळभाजी असाच भाव खाऊन जात आहे. तिच्यात पोषक घटक भरपूर असल्याने शहरांच्या ठिकाणी या भाजीला आता बारमाही ग्राहक आहेत.
कोकणातील या नैसर्गिक फळभाजीचे वाटे वजन केल्यास तिचा दर किलोला ४०० रुपयांच्या वर जातो. सुदैवाने कोकण कृषी विद्यापीठाने ठाणे,रायगड, पालघर जिल्हांत रानावनात, जंगलात पुर्वीपासून ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार्या या कारटोलीवर संशोधन करून तिचे बियाणे विकसित केले आहे. त्यामुळे आता शेतकरी वर्षाचे बारमाही या फळभाजीचे उत्पादन घेताना दिसत आहेत.
या संशोधनाप्रमाणे कोकणातील या नैसर्गिकरित्या जंगलातील प्रामुख्याने वारुळांवर उगविणार्या आणि पर्यावरण बदलामुळे नामशेष होत चाललेल्या या अळंबीवर संशोधन करायला हवे. तरच आगामी काळात नैसर्गिकरित्या अधिकाधिक पौष्टिक मुल्ये असणार्या या चविष्ट अळंबीचे संवर्धन होईल, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
*चौकट*
*पेडा/वारुळांवरील अळंबी महाग असण्याची कारणे*
ही नैसर्गिक अळंबी जंगलातील दलदलीत भागात, प्रामुख्याने मुंग्यानी बांधलेल्या मजबूत अशा ठराविक वारुळांवर उगवतात. माहितीगार विशेषतः धनगर, घोरपी आदी आदिवासी समाजातील लोक या कालावधीत आठ आठ दिवस अशा ठिकाणांची पहाट्याच्या वेळी रेकी करतात. पण रेकी करणार्यांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे हाजिर तो वजीर या न्यायाने ज्याला ती खोदण्याचे कष्ट करून मिळते तो त्या एका दिवसासाठी सहस्त्रापती असतो.
मात्र गेल्या काही वर्षांतील जंगल तोडीमुळे पर्यावरण र्हासासह अशी अळंबी उगविणारी ठिकाणे कमालीची कमी कमी होत आहेत. त्यामुळेच अळंबींचा शोध घेणार्यांना बरेच कष्ट करावे लागतात. त्यातच अशा ठिकाणी हमखास “नागोबा” असतो अशी भ्रामक कल्पना अळंबी खोदून काढणार्यांच्या मनात पिढ्यांनपिढ्या रुजलेली असते. मात्र काही धनवान माणसे मांसाहाराच्या तोडीपेक्षा अधिक चविष्ट असणार्या “या अळंबीपेक्षा बकर्यांचे मटण स्वस्त ” असा कांगावा करतात. या नैसर्गिक अळंबीकडे “दुरुन डोंगर साजरे” म्हणून पाठ फिरविणारे महाभाग वेळोवेळी भेटतात, असे विक्रेते सांगतात.

