फोंडाघाट महाविद्यालयात लोकमान्य टिळक स्मृतिदिन व अण्णाभाऊ साठे जयंती संपन्न

फोंडाघाट महाविद्यालयात लोकमान्य टिळक स्मृतिदिन व अण्णाभाऊ साठे जयंती संपन्न

*कोकण Express*

*फोंडाघाट महाविद्यालयात लोकमान्य टिळक स्मृतिदिन व अण्णाभाऊ साठे जयंती संपन्न*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी नेत्यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ सतीश कामत व कार्यालय प्रमुख श्री. दिपक सावंत यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

प्रास्ताविकात डॉ. संतोष रायबोले म्हणाले की, या नेत्यांनी समाज सुधारण्यासाठी मोठा त्याग केला आहे. लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा सर्वश्रुत आहे. ते वैयक्तिक व संसारिक त्याग करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले. त्याचप्रमाणे अण्णाभाऊंनी माणसांना जातीच्या पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी लढा दिला. तरीही साहित्याच्या माध्यमातून त्यांनी समाजाच्या मुक्तीचे काम केले. अण्णाभाऊंच्या साहित्याने समाज परिवर्तन घडवून आणले. समाजातल्या वंचित घटकाला त्यांनी न्याय मिळवून देण्याचे काम केले.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत म्हणाले की, एक स्वातंत्र्यसूर्य होते तर दुसरे क्रांतीसुर्य होते. एकाने देशाला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी तर दुसऱ्याने जाती जमातीच्या शोषणातून सर्वसामान्यांना मुक्त करण्यासाठी लढा दिला. टिळकांचे लेखन हे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी होते. दोन्ही थोर पुरुषांचे कार्य आपापल्या पातळीवर श्रेष्ठ होते. दोघांच्याही कार्याचा आवाका फार मोठा होता. एका बाजूला देशाला स्वातंत्र्याची आवश्यकता होती, तशीच समाज सुधारण्याचीही आवश्यकता होती. इंग्रजांच्या व सामाजिक गुलामगिरीची बंधने तोडणे आवश्यक होते. अण्णाभाऊंनी दीन, दलित, वंचित, आदिवासी सर्व समावेशक लोकांसाठी काम केले व लेखन केले. त्यामुळे त्यांचे लेखन हे माणसाच्या हृदयाला भिडते. त्यांच्या कथा, कादंबऱ्यातील पात्रे ही वास्तव आहेत. त्यामुळे समाजात धैर्याने आणि संयमाने वागणारी पिढी निर्माण झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विनोदसिंह पाटील यांनी केले तर आभार प्रा. जगदीश राणे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्वच कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!