*कोकण Express*
*ओसरगाव टोलनाक्याचे टेंडर स्वतःच्या कंपनीला मिळविण्यासाठीच आ. नितेश राणेंनी घेतली ना. गडकरींची घेतली भेट – सुशांत नाईक*
*तळेरे-गगनबावडा रस्त्याचे टेंडर आपल्या ठेकेदाराला मिळण्यासाठीच आ. नितेश राणेंचा टेंडर रद्द करण्याचा प्रयत्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भाजपा आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घेतलेली भेट ही ओसरगाव टोलनाक्याचे टेंडर स्वतःच्या कंपनीला
मिळावे यासाठी घेतली, अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे. परंतु नितेश राणेंनी टोलनाका सुरु करण्यासाठी कितीही आटापिटा केला तरी
जोपर्यंत एम. एच ०७ गाड्यांना टोलमाफी होत नाही. तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व युवासेना ओसरगाव येथील टोलनाका सुरू
करू देणार नाही असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला आहे.
एकीकडे जिल्ह्यात टोलमाफी मिळावी यासाठी आमदार नितेश राणेंनी स्टंटबाजी करायची आणि दुसरीकडे ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन आपल्या कंपनीला ओसरगाव टोलनाक्याचे टेंडर मिळण्यासाठी आटापिटा करायचा हि राणेंची दुटप्पी भूमिका आहे. मागच्या वेळी सुरु केलेला टोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष युवासेना व कृती समितीने धडक देऊन बंद केला. एम.एच.०० गाड्यांना टोलमाफी जोपर्यंत मिळत नाही. महामार्गाचे अर्धवट असलेले काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाका आम्ही सुरू करू देणार नाही असे सुशांत नाईक यांनी सांगितले.
ना. गडकरी यांच्याशी घेतलेली भेट तळेरे वैभववाडी- गगनबावडा रस्त्यासाठी होती असे राणेंनी प्रसार माध्यमांना सांगितले असले तरी त्यातही नितेश राणेंचा स्वार्थ दडलेला आहे. या रस्त्याचे टेंडर ४० टक्के बिलो दराने ठेकेदाराने भरले आहे. यात शासनाच्या निधीची बचत होणार आहे. मात्र अधिकाऱ्यांनी हे काम दर्जेदार आणि लवकरात लवकर करून घ्यावे. मात्र आ. नितेश राणेंच्या मर्जीतील ठेकेदाराला हे काम मिळाले नसल्याने ४० टक्के बिलोचे कारण देऊन हे टेंडर रद्द करण्याचा प्रयत्न आ. नितेश राणे करत आहेत. आणि जर हे टेंडर रद्द झाले तर अजून पुढील किती महिने हा रस्ता खड्डेमय राहिल हे सांगता येत नाही. त्यामुळे ज्या ठेकेदाराला हे टेंडर मिळाले आहे. त्याच ठेकेदाराकडून सरकराने हे काम करून घ्यावे. काम दर्जेदार न झाल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्याची सक्त ताकीद सरकारने द्यावी अशी मागणी सुशांत नाईक यांनी केली आहे.