मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी दरम्यान

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी दरम्यान

*कोकण Express*

*मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी दरम्यान..*

*सिंधुदुर्गनगरी,दि.१३:*

मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन व्हावे या हेतूने “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा करण्यात येतो. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व संस्था, विद्यापीठे महाविद्यालये, ग्रंथालये इत्यादी सर्व संस्थांमधून राज्याची राज भाषा असलेल्या मराठी भाषेचा उपयोग जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने यंदाच्या वर्षी दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२१ या कालावधीमध्ये “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा करण्यात येणार आहे. ग्रंथालय संचालनालय मुंबईच्या वतीने “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” या कार्यक्रमाचे  उद्घाटन दिनांक १४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, नगर भवन, मुंबई येथे उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दुरदृश्य प्रणालीव्दारे (ऑनलाईन पध्दतीने) करण्यात येणार आहे. उद्घाटनपर कार्यक्रमामध्ये मराठी भाषेतील दर्जेदार पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. तसेच मराठी भाषेतील पीडीएफ आणि डिजिटाईजड स्वरुपातील ग्रंथांची लिंक ग्रंथालय संचालनालयाच्या संकेतस्थळावर वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ग्रंथप्रदर्शन व संकेतस्थळावरील अंकीय ग्रंथांचे उद्घाटन श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या प्रसंगी मनिषा देवगुणे, सहाय्यक आयुक्त (विकास शाखा) कोकण भवन, नवी मुंबई यांनी लिहिलेल्या मराठी ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, नगर विकास,ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण,आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण ओ.पी. गुप्ता, मराठी भाषा विभाग सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा, राजीव निवतकर जिल्हाधिकारी, मुंबई शहर आदी मान्यवर उपस्थित असणार आहे.

दुरदृश्य प्रणालीव्दारे ऑनलाईन कार्यक्रमात सहाभागीसाठी https://www.youtube.com/DOLMaharashtra या लिंकवर क्लीक करावे व जास्तीत जास्त नागरीकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन‍ जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन बा. हजारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!